नाफेडची तूर खरेदी बंद,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:07 IST2017-02-23T00:07:16+5:302017-02-23T00:07:16+5:30
स्थानिक बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीपासून शासकीय तूरखरेदी नाफेडने बंद केल्यामुळे येथील बाजारात तुरीचे भाव कोसळले.

नाफेडची तूर खरेदी बंद,
अंजनगावात शेतकऱ्यांचा चक्काजाम
वाटाघाटीनंतर तोडगा : २८४ कास्तकार, ७९१५ क्विंटल आवक
अंजनगांव सुर्जी : स्थानिक बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीपासून शासकीय तूरखरेदी नाफेडने बंद केल्यामुळे येथील बाजारात तुरीचे भाव कोसळले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता समितीच्या प्रवेशद्वारावर वाहने लाऊन चक्काजाम आंदोलन केले. यामुळे अंजनगाव-अकोट मार्ग बंद झाला होता.सायंकाळी पाच वाजता बाजार समिती व शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वाटाघाटी झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नाफेडद्वारा यावर्षी अंजनगांवात शासकीय दराने एकूण २८४ शेतकऱ्यांची ७९१५ क्विंटल तूर मोजण्यात आली. यानंतर तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे कारण देऊन बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रातील जाहीर सूचनेद्वारे तूरखरेदी बंद केल्याची माहिती दिली. परंतु यामुळे तुरीचे दर कोसळले.
- तर ‘त्या’ मालाची होणार खरेदी
अंजनगांव सुर्जी : बुधवारी तुरीचा भाव अवघा ३८०० रूपये प्रतिक्विंटलवर आल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. स्थानिक बाजार समितीत यावर्षी तुरीची मोठ्या सुरुवातीपासूनच मोठी आवक सुरु होती. परंतु नाफेडच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन व्यापारी लॉबीने शेतकऱ्यांची तूर न मोजता आपले उखळ पांढरे केले. काही सतर्क शेतकऱ्यांनी याप्रकरणात नाफेडच्या खरेदी केंद्रावरचा घोटाळा रंगेहात पकडला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’आले होेते. आणि व्यापारी तूरखरेदी केंद्रावरुन गायब झाले होते. परंतु ही परिस्थिती फक्त एकच दिवस राहिली आणि अचानक आवक वाढल्याचे कारण देऊन बाजार समिती मार्फत तूरखरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर बाजार समिती व शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बाजार समितीत आणखी दोन काटे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडे तूर विकली आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांचा माल नाफेडमध्ये विक्रीसाठी नेता येईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
बाजार समितीला शासकीय तूर खरेदी बंद करण्याचे पत्र कुणी दिले माहित नाही. परंतु नाफेडचे तूर खरेदीकेंद्र बुधवारी सुरू आहे.येथे शासकीय दराने खरेदी होत आहे. आम्ही कोणतीही लेखी सूचना दिलेली नाही. सर्व काही स्थानिक बाजार समितीच्या अखत्यारीत होत आहे, असे नाफेडचे ग्रेडर जी.एम. रामागडे यांनी सांगितले.