मोर्शीत तुरीची ६१०० रूपये दराने खरेदी

By Admin | Updated: February 15, 2015 00:10 IST2015-02-15T00:10:20+5:302015-02-15T00:10:20+5:30

तुरीचे अपेक्षित पीक न आल्यामुळे तुरीला यावर्षी चांगला भाव मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर ६१०० रूपये प्रति क्विंटल ...

Purchase of Morsheet Turli at Rs. 6100 | मोर्शीत तुरीची ६१०० रूपये दराने खरेदी

मोर्शीत तुरीची ६१०० रूपये दराने खरेदी

लोकमत विशेष
मोर्शी : तुरीचे अपेक्षित पीक न आल्यामुळे तुरीला यावर्षी चांगला भाव मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर ६१०० रूपये प्रति क्विंटल या दराने तूर खरेदी करण्यात आली. दुसरीकडे कापसाला हमी भावापेक्षाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनचे पीक हातातून गेले. सोयाबीनसोबत तुरीचे पीक घेणाऱ्याना निदान तूर तरी चांगली होईल, अशी अपेक्षा होती. परंतु तुरीला फुलोर येण्याच्या कालावधीत पाऊस न आल्यामुळे कोरडवाहू शेतातील तुरीच्या झाडावर अवघ्या दोन-चार शेंगा दिसून येत होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, अशा तूरळक शेतकऱ्यांच्या तूर पिकाची स्थिती काहीअंशी चांगली होती.
सध्या तूर पिकाची सवंगणी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी येथील बाजार समितीच्या यार्डवर तुरीचे दोन हजार पोते शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणले होते. मध्य प्रदेश सीमेला लागूनच असलेल्या धारुड येथील भाऊ धुर्वे या शेतकऱ्याची तूर ६१०० रुपये प्रती व्किंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली. अन्य शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळाला. तुरीला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत असला तरी पाहिजे तेवढ्या तुरीचे उत्पादन यावर्षी झालेच नाही. त्यामुळे भाववाढीचा फारसा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही, असे चित्र आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीकरिता आणून बाजारभावाचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव लाभेष लिखितकर यांनी केले.
मोर्शी तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील तीनही जिनिंग कारखाने मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. काही वर्षांपूर्वी येथील औद्योगिक वसाहतीत खासगी कारखानदाराने उभारलेल्या एका जिनिंग प्रेसिंग कारखान्याच्या यार्डवर भारतीय कापूस महामंडळाने यावर्षी कापसाची खरेदी सुरु केली.
त्यातून शेतकऱ्यांना हमीभाव मिळत होता. आतापर्यंत या ठिकाणी जवळपास १३००० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला; तथापि संबंधित कारखान्याच्या यार्डवर कापसाच्या गंज्या लागल्यमुळे शिवाय गलाई क्षमतेकडे लक्ष ठेवून संबंधित कारखानदाराच्या यार्डवर कापसाची खरेदी मध्यांतरी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांचे फावते आणि ते पडक्या भावाने गावा-गावांत कापसाची खरेदी करतात.
संबंधित व्यापारी शेतकऱ्यांना हमीभाव देत नाहीत; तथापि या बाबीकडे बाजार समिती आणि कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे कमीत कमी हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांची गोेची थांबविण्याकरिता प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Purchase of Morsheet Turli at Rs. 6100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.