अमरावती : जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदीला २७ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात पाच ठिकाणच्या खरेदी केंद्रांवर सुरुवात झाली. १ डिसेंबर रोजी अचलपूर येथील शासकीय केंद्रावर कापूस खरेदीला प्रारंभ झाला. मागील सहा दिवसांत या कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा १३ कोटी ६८ लाख रुपयांचा २,४०० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२७ नोव्हेंबरला प्रथम अमरावती येथील शेतकरी सहकारी जिनिंग ॲण्ड प्रेसिंग कामुंजा व दर्यापूर येथील सद्गुरु जिनिंग-प्रेसिंग कृषी बाजार समिती येथे शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ झाला. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी मोर्शी आणि वरूड येथील दोन्ही केंद्र सुरू करण्यात आले. १ डिसेंबरला अचलपूर येथील केंद्र सुरू करण्यात आले. आतापर्यंत या पाच खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. यामध्ये अमरावती येथील केंद्रावर १२५.६० क्विंटल, दर्यापूर १२५४.३४, मोर्शी केंद्रावर ६२.६५, वरूड केंद्रावर २२५.७५ आणि अचलपूर केंद्रावर १२४.१० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सहा दिवसांत पाचही केंद्रांवर एकूण २२७४.७५ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून अमरावती बाजार समितीत १२५.६० क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. एकूण २,४०० क्विंटल कापसाची शासकीय खरेदी झाल्याची नोंद आहे.
बॉक्स
एफएक्यू दर्जाचा कापूस कमी
यावर्षी बोंडअळी व बोंडसडच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात घट आली आहे. एफएक्यू दर्जाच्या कापसाची उपलब्धता फार कमी आहे. त्यामुळे यंदाही एफएक्यू दर्जाचा कापूस शासकीय केंद्रात तुलनेत कमी येत आहे. सीसीआय एफएक्यू ,एलआरए असा दर्जा बघूनच कापसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कापूस उत्तम दर्जाचा आहे त्या शेतकऱ्याचा कापूस शासकीय केंद्रात खरेदी केला जात आहे .परिणामी जिल्ह्यातील पाचही शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची पाहिजेत तशी आवक नाही. शासकीय कापूस खरेदीत कापसाला ५,७२५ रुपये हमी भाव देण्यात येत आहे.