शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा
By Admin | Updated: September 24, 2015 00:11 IST2015-09-24T00:11:19+5:302015-09-24T00:11:19+5:30
शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला दंडात्मक व न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा
अमरावती : शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला दंडात्मक व न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ओमप्रकाश सूरजमल शर्मा (४५, रा.जवाहर रोड) असे आरोपीचे नाव आहे.
मोरबाग परिसरातील रहिवासी जयप्रकाश गजाधर नागलिया (५४) त्यांच्या पत्नीसोबत १४ जानेवारी २०१२ रोजी जवाहर मार्गावरील एका प्रतिष्ठानात खरेदीसाठी गेले होते. त्या दुकानासमोर वाहनांची गर्दी असल्यामुळे जयप्रकाश यांनी शेजारच्या एका व्यापारी प्रतिष्ठानासमोर दुचाकी उभी केली होती. त्यावेळी आरोपी ओमप्रकाश शर्मा याने जयप्रकाशला शिवीगाळ केली आणि मारहाणीची धमकी दिली. याबाबत जयप्रकाश यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस शिपाई संजय देशमुख व पांडुरंग कट्यारमल यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (४) एम.ए.शिलार यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता आशा ठाकरे यांनी सात साक्षीदारांची तपासणी केली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिध्द झाला. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम २९४, ५०४, ५०६, ५०९ अन्वये सदर शिक्षा सुनावली. या कालावधीत आरोपी पोलिसांच्या निगराणीत न्यायालयात बसले होते. तसेच प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास तसेच भादंविच्या कलम ३२३ नुसार १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)