पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमाने का केले हद्दपार ?
By Admin | Updated: September 26, 2016 00:32 IST2016-09-26T00:32:13+5:302016-09-26T00:32:13+5:30
शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमाचा कधीकाळी महत्त्वाचा आधार राहिलेल्या पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमातून हद्दपार का करण्यात आले,

पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमाने का केले हद्दपार ?
अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमाचा कधीकाळी महत्त्वाचा आधार राहिलेल्या पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमातून हद्दपार का करण्यात आले, हा प्रश्न पोलीस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
नरबळी प्रकरणाचे वादळ उठल्यानंतर आश्रम पदाधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबियांचे नाव समोर आणले गेले. नरबळी प्रकरणाचा तपास सुरू असताना आश्रमाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबियांचा जाहीर नामोल्लेख होणे, ही बाब चव्हाणांच्या कृत्यांबाबत दाट संशय निर्माण करणारी आहे.
दादा चव्हाण हे पिंपळखुट्याच्या आश्रमाचे एकेकाळी कारभारी होते. महाराजांच्या इशाऱ्यावर ते कार्य करीत असे. म्हणूनच ते महाराजांच्या जवळचे होते. मग नेमके असे काय घडले की, दादा चव्हाण यांनी आश्रमात राहूच नये, पुन्हा पायही ठेवू नये, असा निर्णय दोन-तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला? दादा चव्हाणांना हुसकावून लावेपर्यंतची वेळ का आली? आश्रमाला त्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्यांच्या उपस्थितीदरम्यान नेमके काय खटकले? दादा चव्हाणांचे कुठले कृत्य आश्रमाला अडचणीत आणू शकणारे होते? दादा चव्हाणांनी केलेले कुठले असे आक्षेपार्ह कृत्य आश्रमाच्या नजरेत आले की, त्यामुळे त्यांना आश्रमातून केवळ हद्दपार करणेच योग्य ठरणार होते? कधीकाळी आसनाजवळ स्थान देणारे शंकर महाराजही चव्हाणांबाबत इतके कठोर का झाले होते? असा टोकाचा निर्णय का घेण्यात आला होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुद्दा नरबळीसारख्या महत्त्वपूर्ण गुन्ह्यांशी संबंधित असल्यामुळे सर्वच गूढ प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे.
आश्रमात दादा चव्हाण यांचे ज्या काळात वास्तव्य होते, त्याकाळात आश्रमात काय-काय घडले? जुने अपमृत्यू प्रकाशात आले, त्याकाळी आश्रमात दादा चव्हाण यांचे वास्तव्य होते काय? असेल तर त्याकाळी त्यांचे अधिकार काय होते? प्रभावी व्यक्ती या नात्याने त्यांनी आश्रमात घडलेल्या संशयास्पद प्रकरणांबाबत, अपमृत्यूबाबत काय भूमिका वठविली? कायद्याचा त्यांनी सन्मान करून कर्तव्य निभावले की कायदा वाकविण्यासाठी आश्रमाच्या प्रभावाचा वापर केला? चव्हाण या अडनावाभोवती निर्माण झालेले गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी या प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे झाले आहे.
आश्रमात आढळलेल्या वनखात्याच्या मालकीच्या अपसंपदेबाबतचा गुन्हा काही वर्षांपूर्वी वनविभागाने दाखल केला होता. या अवैध कार्यात त्यावेळी या चव्हाणांची भूमिका 'दादा' नावाला शोभणारी होती काय? नेमके काय घडले होते आश्रमात? या मुद्यांचा तळ गाठून पोलिसांना चव्हाण नावाभोवतीचे गूढ छेदता येईल.