‘पुंडलिक वरदे.. हरी..विठ्ठल’चा गजर !
By Admin | Updated: November 16, 2016 00:15 IST2016-11-16T00:15:45+5:302016-11-16T00:15:45+5:30
पुंडलिक वर दे..हरी विठठल..श्री ज्ञानदेव तुकाराम.., जय हरी विठ्ठल...च्या नामगजराने मंगळवारी विदर्भाची पंढरी कौंडण्यपूर नगरी दुमदुुमली. ...

‘पुंडलिक वरदे.. हरी..विठ्ठल’चा गजर !
कौंडण्यपुरात दहीहंडी : रूख्माई-वल्लभाच्या दर्शनाचा अद्वितीय सोहळा
तिवसा : पुंडलिक वर दे..हरी विठठल..श्री ज्ञानदेव तुकाराम.., जय हरी विठ्ठल...च्या नामगजराने मंगळवारी विदर्भाची पंढरी कौंडण्यपूर नगरी दुमदुुमली. रूख्माई-वल्लभाच्या दर्शनाच्या अनिवार ओढीने येथे आलेल्या हजारोे भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मंगळवारी कौंडण्यपूरात प्रती पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता. कमला रूख्मिणी पिठाचे पिठाधीश जगदगुरू राजेश्वर माऊली यांनी दहीहंडी फोडली.
प्राचीन विदर्भाची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर नगरीत कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली. मंगळवारी दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भाविकांची गर्दी कौंडण्यपुरात उसळली होती. कौंडण्यपूरात दीड दिवस प्रत्यक्ष पांडुरंग वास करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नव्हे, तसे वचन खुद्द पांडुरंगानेच त्यांचे प्राणप्रीय सदाराम महाराजांना दिले होते. या पवित्र मातीमध्ये पुराणातील पाच महासतींनी जन्म घेतला. येथील मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने देवी रूख्मिणीचे हरण केले होते. या प्राचीन नगरीला वैभवशाली परंपरा लाभली आहे. यंदा दहीहंडी उत्सवाला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती प.पू.जितेंद्रनाथ महाराज, तिवसा मतदार संघाच्या आ. यशोमती ठाकूर, नागपूर येथील सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे, संस्थानचे अध्यक्ष हिम्मत टाकोणे, हभप रंगराव महाराज, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला पांडव, माजी उपसभापती भारत ढोणे आदींची उपस्थिती होती. उपाध्यक्ष वसंत डाहे, सचिव नामदेव उमाळकर, कोषाध्यक्ष अरविंद वेरूळकरदेखील उपस्थित होते.
५० पालखींची परिक्रमा
मंगळवारी सकाळी कौंडण्यपूरला आलेल्या ५० पालख्यांनी नगरात परिक्रमा केली. यावेळी चौकाचौकात दिंडी व पालखींचे स्वागत करण्यात आले. दुपारी संत अच्युत महाराज संस्थानचे अध्यक्ष सुधीर दिवे व कुटुंबियांच्यावतीने पालख्यांसमवेत आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यातल आले. सायंकाळी ६ वाजता टेकडीवर नेत्रदीपक दहीहंडी सोहळा पार पडला.