‘पुंडलिक वरदे...’ च्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी
By Admin | Updated: July 28, 2015 00:47 IST2015-07-28T00:47:46+5:302015-07-28T00:47:46+5:30
‘विठ्ठल विठ्ठल..जय हरी विठ्ठल’, ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल..’च्या जयघोषाने आज अंबानगरी दणाणून गेली.

‘पुंडलिक वरदे...’ च्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी
देवशयनी आषाढी एकादशी : विविध परिसरातील मंदिरांमध्ये विठ्ठला-रुक्मिणीची आराधना
अमरावती : ‘विठ्ठल विठ्ठल..जय हरी विठ्ठल’, ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल..’च्या जयघोषाने आज अंबानगरी दणाणून गेली. शहरातील विविध विठ्ठल मंदिरांत भक्तांची मांदियाळी पहायला मिळाली. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमिवर अनेक दिवसांपासून या मंदिरांत सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची यथासांग सांगता पार पडली.
अंबागेटच्या आतील पुरातन विठ्ठल मंदिरात एकादशीनिमित्त पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली होती. पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यास असमर्थ परंतु विठोबाच्या भक्तीत लीन झालेल्या लाखो भक्तांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. अंबागेट, बुधवारा, नवाथेनगर, अंबा कॉलनीतील विठ्ठल मंदिरांंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याचवेळी अंबागेटमधील विठ्ठल मंदिरात पहाटे ५.३० वाजता महाभिषेक करण्यात आला.दरम्यान मंदिराचे लोकार्पणही करण्यात आले. येथे मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शालिनी गुल्हाने, अशोक गुल्हाने उपस्थित होते. सकाळी ११ वाजता आ.सुनील देशमुख यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण झाले. दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर वारकरी महिला मंडळादरे हरिपाठ आणि भजन-कीर्तन करण्यात आले. रात्री ८ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज वारकी भजनी मंडळाच्यावतीने भजन आणि कीर्तन करण्यात आले. यावेळी शंकरराव हिंगासपुरे, नागोराव पिंपळे, मधुकर डाफे, मनोहर गुल्हाने, अविनास गुल्हाने, दिगंबर जिरापुरे, शिवाजी शिरभाते आदींची उपस्थिती होती.