सततच्या पावसामुळे बाधित पिकांच्या पंचनाम्यांचे निर्देश '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:36+5:30
अमरावती व अचलपूर तालुक्यांतील २४ गावांना अद्याप विहीर अधिग्रहणाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईच्या जोखडातून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने योग्य कार्यवाहीच्या सूचना झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्यात.

सततच्या पावसामुळे बाधित पिकांच्या पंचनाम्यांचे निर्देश '
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्हाभरात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश गुरुवारी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेत देण्यात आले. शिवाय अमरावती व अचलपूर तालुक्यांतील २४ गावांना अद्याप विहीर अधिग्रहणाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईच्या जोखडातून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने योग्य कार्यवाहीच्या सूचना झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्यात.
जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे पार पडली. यावेळी सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख, सभापती दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, सदस्या पार्वती काठोळे, वासंती मंगरोळे, सुशीला कुकडे, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, सिंचनचे कार्यकारी अभियंता शिरीष तट्टे, पाणी पुरवठ्याचे राजेंद्र सावळकर, कॅफो चंद्रशेखर खंडारे, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी, कृषीचे अनिल खर्चान व अन्य निवडक अधिकारी उपस्थित होते. सततच्या पावसामुळे मुंग, उडीद पिके गारद झाली. काही ठिकाणी कपाशीवरही रोगांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश अध्यक्षांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्हाभरात मागेल त्याला शेततळयबाबत विस्तृत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अमरावती तालुक्यातील ७ आणि अचलपूर तालुक्यातील १८ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी गावांना विहीर अधिग्रहाणव्दारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सभागृहात दिली.सिंचन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या व पूर्ण झालेल्या तसेच मंजूर कामांचा विस्तृत आढावाही घेण्यात आला. पथ्रोट येथे पाणी पुरवठ्यासंदर्भात मजीप्राकडून कामे संथगतीने सुरू असल्याचा मुद्दा सदस्या वासंती मंगरोळे यांनी मांडला. त्याअनुषंगाने मजीप्रा अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश अध्यक्षांनी दिले.
महावितरणला नोटीस
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेला पदाधिकारी व अधिकाºयांची उपस्थिती वगळता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून १३ जण सहभागी झाले होते. मात्र वीज महावितरण कंपनीच्या अधिकाºयांना उपस्थित राहण्याबाबत लेखी कळवूनदेखील कुणीही अधिकारी अथवा प्रतिनिधी सभेला उपस्थित नसल्याने महावितरणला कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश सभेचे सचिव यांना अध्यक्षांनी दिले.