युती सरकारला खाली खेचा
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:18+5:302016-04-03T03:49:18+5:30
दुष्काळासाठी आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी शासकीय तिजोरी उघडली होती.

युती सरकारला खाली खेचा
काँग्रेस कार्यकर्ता मेळावा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
चांदूरबाजार : दुष्काळासाठी आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी शासकीय तिजोरी उघडली होती. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा डेपो उघडले होते परंतु सत्तारुढ युती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय न घेता त्यांच्या जखमांना मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते शनिवारी येथे बोलत होते.
स्थानिक लंगोटे मंगल कार्यालयात आयोजित अचलपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस होत्या तर प्रमुख उपस्थितीत आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, राज्य सरचिटणीस संजय खोडके, रामकिसन ओझा, जि. प. अध्यक्ष सतीश उईके, जिल्हा महिला काँग्रेसची अध्यक्षा छाया दंडाळे, माजी आमदार सुलभा खोडके हे होत्या.
पुढे बोलताना उद्घाटक व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठवाड्याचा शेतकरी मदतीसाठी दारोदारी फिरला व शेवटी मंत्रालयासमोर आत्महत्या केली. त्यावरून हे सरकार किती निष्ठूर आहे, हे सिद्ध होते. मराठवाड्याप्रमाणेच अमरावती विभागात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मात्र सरकारला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी जायलाही वेळ नाही. राज्यात बागायती जमीन ११ टक्केच आहे तरीही या सरकारने सिंचनासारख्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने यावर्षीच्या बजेटमध्ये केवळ ३ टक्केच वाढ केली आहे. त्यामुळे सरकारकडे पैसा नसेल तर वाटेल तितके कर्ज काढा. मात्र शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सोडवा व शेतकऱ्यांचा ७/१२ सुद्धा कोरा करा, अशी मागणी यावेळी केली.
सरकारचे आश्वासन खोटे
चांदूरबाजार : खोटे आश्वासन देणाऱ्या या सरकारला जनता लवकरच आपली जागा दाखवून देणार आहे, हे नुकत्याच संपन्न झालेल्या गुजरात व बिहार येथील निवडणुकीतून दिसून आले आहे, असे मत महिला प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे सतत पडणाऱ्या दुष्काळ, नापिकीमुळे तसेच गारपिटीमुळे आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला आहे, असे प्रतिपादन काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. यावेळी आमदार वीरेंद्र जगताप यांनीसुद्धा विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, अमरावती विभागात यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. त्यामागील कारण या भागात सतत पडलेला दुष्काळ असून शेतकऱ्याला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे, असे असताना हे सरकार केवळ आश्वासनांचा भडीमार करीत आहेत.
कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष किशोर किटुकले, शहर अध्यक्ष भाष्कर हिरडे, किशोर देशमुख, समिर देशमुख, जवाभाई, राजाभाऊ टवलारकर, कैलाश आवारे, मीनल देशमुख, नलिनी हुड, बाबुराव जवंजाळ, नीळकंठ चव्हाण, हरिीचंद्र अग्रवाल, रावसाहेब छापानी, अनंत साबळे, बाबुभाई इनामदार, शिवाजी बंड, अरविंद लंगोटे, नाजीम बेग, हरीदास नाथे, प्रवीण वाघमारेसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंगेश देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन किशोर किटुकले यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
देशमुखांच्या आक्रमक भाषणाने नेतेही झाले अवाक्
काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या आक्रमक भाषणाने उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवीन स्फूर्ती निर्माण झाल्याचे दिसत होते. यावेळी बबलू देशमुखांच्या समर्थनार्थ सूरू असलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृह दणाणले होते. हे बघून काँग्रेसचे नेतेसुध्दा आवक् झाले होते.