सार्वजनिक मंडळांनी घ्यावी प्रसादाची काळजी
By Admin | Updated: September 21, 2015 00:05 IST2015-09-21T00:05:27+5:302015-09-21T00:05:27+5:30
सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे व त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांना ...

सार्वजनिक मंडळांनी घ्यावी प्रसादाची काळजी
खबरदारी : अन्न, औषधी विभागाची गणेश मंडळांना सूचना
अमरावती : सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे व त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांना अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्न पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा. तसेच प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्ययावत करून ठेवावी. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी.
फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळाची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना, नोंदणीधारकांकडून करावी. कच्चे, सडलेले किंवा टाकाऊ फळांचा वापर करू नये. प्रसादचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील, याची खात्री करूनच वापरावी. आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची खात्री करावी, प्रसाद उत्पादन करणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) इत्यादी देण्यात यावे व प्रत्येकवेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ ठेवावेत. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसल्याची खात्री करून घ्यावी. दूध अथवा दूग्धजन्य पदार्थ थंड राहतील, असे कमी तापमानावरच साठवणुकीस ठेवावेत.
खवा, माव्याची वाहतूक व साठवणूक थंड, रेफ्रीजरेटेड वाहनांतून करावी व प्रसादामध्ये यांचा वापर होत असल्यास दक्षात घेण्यात यावी. जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला खवा, मावा प्रसादासाठी मुळीच वापरू नये. अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे व त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील.
या व्यतिरिक्त अन्न, प्रसाद याबाबत काही संशय असल्यास आपल्या क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी अथवा सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. वरीलसंदर्भात माहिती, तक्रार, सूचना असल्यास एफडीए हेल्पलाईन क्र. १८००२२२३६५ वर कळवावे, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)