घरांच्या दुरुस्तीसाठी सव्वाकोटींचे अनुदान
By Admin | Updated: September 15, 2015 00:22 IST2015-09-15T00:22:49+5:302015-09-15T00:22:49+5:30
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या ३ हजारांवर घरांच्या दुरूस्ती व पूर्ण बांधणीकरिता १ कोटी २४ लाखांचा निधी सर्व तालुक्यांना सोमवारी वितरित करण्यात आला.

घरांच्या दुरुस्तीसाठी सव्वाकोटींचे अनुदान
तीन हजारांवर घरांचे नुकसान : दर्यापूर तालुक्याला सर्वाधिक १८ लाख
अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या ३ हजारांवर घरांच्या दुरूस्ती व पूर्ण बांधणीकरिता १ कोटी २४ लाखांचा निधी सर्व तालुक्यांना सोमवारी वितरित करण्यात आला. यापूर्वी १६ लाख ६० हजारांची मदत बाधित नागरिकांना वितरित करण्यात आली आहे. यंदा एकूण १ कोटी ४० लाख ६० हजारांचे अनुदान जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३ हजार १३५ घरांचे नुकसान झाले होते. या घरांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा प्रशासनाने १ कोटी २४ लाखांचे अनुदान सोमवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना वितरीत केले. आतापर्यंत अमरावती तालुक्याला १४ लाख २० हजार, भातकुली १४ लाख २० हजार, तिवसा ११ लाख २० हजार, चांदूररेल्वे ८ लाख २० हजार, धामणगाव रेल्वे ७ लाख २० हजार, नांदगाव खंडेश्वर ६ लाख २० हजार, मोर्शी १२ लाख २० हजार, वरूड १२ लाख २० हजार, अचलपूर १७ लाख २० हजार, चांदूरबाजार ६ लाख २० हजार, दर्यापूर १९ लाख २० हजार, अंजनगाव सुर्जी ४ लाख २० हजार, धारणी ४ लाख २० हजार व चिखलदरा तालुक्यात ४ लाख रूपये असे एकूण १ कोटी ४० लाख ६० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
यापूर्वी १६ लाख ६० हजारांचे अनुदान वितरित
जिल्ह्यात यंदा पडझड झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रत्येक तालुक्याला १ लाख २० हजार असे एकूण १६ लाख ६० हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच अमरावती तालुक्यात पूर्णत: घरांसाठी १४ हजार, अचलपूर तालुक्यात १८ घरांसाठी ४४ हजार ७०० अंजनगावला २ घरांसाठी ७ हजार ६०० व चिखलदरा तालुक्यात १ घरासाठी ३ हजार ८०० रुपयांचे अनुदान देण्यात आले.