अनैसर्गिक गर्भपात केंद्रांची माहिती द्या, २५ हजार मिळवा
By Admin | Updated: March 15, 2017 00:09 IST2017-03-15T00:09:50+5:302017-03-15T00:09:50+5:30
अवैध सोनोग्राफी केंद्र अथवा अनैसर्गिक गर्भपात केंद्राची माहिती दिल्यास संबंधिताना शासनाकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.

अनैसर्गिक गर्भपात केंद्रांची माहिती द्या, २५ हजार मिळवा
पत्रपरिषद : १५ ते ३१ मार्चदरम्यान सोनोग्राफी केंद्राची विशेष तपासणी
अमरावती : अवैध सोनोग्राफी केंद्र अथवा अनैसर्गिक गर्भपात केंद्राची माहिती दिल्यास संबंधिताना शासनाकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. सदर व्यक्तीचे नाव गोपनीय राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ तालुक्यातील मिरज येथे १ मार्च रोजी बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या अनोंदणीकृत भारती हॉस्पिटलमध्ये गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेने कठोर उपाययोजनेची कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार १५ ते ३१ मार्चदरम्यान प्रत्येक सोनोग्राफी केंद्र, मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविली जाईल. अनैसर्गिक गर्भपात व अनोंदणीकृत सोनोग्राफी केंद्राची माहिती जाणून घेण्यासाठी खबऱ्यांची मदत घेतली जाईल. त्याकरिता पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. अनैसर्गिक गर्भपात करण्यास प्रवृत्त करणे किंवा अवैध सोनोग्राफी केंद्र असल्यास पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. यासाठी १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व सोनोग्राफी केंद्र आॅनलाईन आहेत. अवैध गर्भपातप्रकरणी एकूण ७ प्रकरणांत फौजदारी दाखल करण्यात आली आहे. यात चार शहरात तर तीन प्रकरणे ही ग्रामीण भागातील आहेत. अनैसर्गिक गर्भपात रोखण्यासाठी समाजमनाने पुढे यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावने यांनी केले. शहरातील प्रत्येक सोनोग्राफी केंद्राची नियमित तपासणी सुरू आहे. अनैसर्गिक गर्भपात होणार नाही, यासाठी ‘क्रॉस चेकिंग’ केले जाते. फिरते पथक, आॅनलाईन नोंदणी आदी बाबींवर नजर असल्याचे एमओएच सीमा नैताम म्हणाल्या. पत्रपरिषदेला अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, कैलास घोडके, डीसीपी प्रदीप चव्हाण आदी हजर होते. (प्रतिनिधी)
शहरात सर्वाधिक ८९ सोनोग्राफी केंद्र
जिल्ह्यात १२९ नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्र आहेत. यात शहरातील ८९ केंद्रांचा समावेश आहे. यापूर्वी शहरात १२६ केंद्र होते. सन २००९ ते १० या काळात २५ केंद्र कायमची बंद करण्यात आलीत. ११ तात्पुरते बंद असून चार प्रकरणे न्यायालयीन, तर सात केंदे्र विनंती अर्जानुसार बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात तीन शासकीय, ३७ खासगी केंद्र आहेत.
आता अशा केंद्रांवरही नजर
जिल्ह्यात नोंदणीकृत ४९ गर्भपात केंद्र असून यात १४ शासकीय तर ३५ खासगी आहेत. तसेच शहरात ७८ गर्भपात केंद्र आहेत. या सर्व के द्रांवर आरोग्य विभागाची नजर राहील. त्याकरिता धाडसत्र राबवून येथील कामकाजाची तपासणी केली जाणार आहे.