प्रथमेशच्या कक्षात चोरपावलांनी प्रवेश

By Admin | Updated: September 12, 2016 00:09 IST2016-09-12T00:09:12+5:302016-09-12T00:09:12+5:30

पिंपळखुटा येथील ज्या आश्रमात नरबळीच्या उद्देशाने प्रथमेशच्या गळ्यावरून ब्लेड फिरविले गेले,...

Prothamesh's cell thief accessed | प्रथमेशच्या कक्षात चोरपावलांनी प्रवेश

प्रथमेशच्या कक्षात चोरपावलांनी प्रवेश

धोका कायमच : पत्नीला पाठविले, शिरीष चौधरींचा हेतू काय ?
अमरावती : पिंपळखुटा येथील ज्या आश्रमात नरबळीच्या उद्देशाने प्रथमेशच्या गळ्यावरून ब्लेड फिरविले गेले, त्याच आश्रमातील पदाधिकाऱ्यांकडून प्रथमेशच्या जीवाला आजही धोका असल्याचे निरीक्षण प्रथमेशच्या नातेवाईकांनी नोंदविले आहे.
प्रथमेश हा गुन्ह्याचा एकमेव पुरावा आहे. त्याच्या बोलण्याने, त्याच्या जगण्याने आश्रमातील अनेक लोक अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. प्रथमेश वाचणारच नाही अशा हेतूने त्याचा गळा चिरण्यात आला होता. परंतु डाव फसला. प्रथमेश वाचला. गुन्हेगारांची आता बोबडी वळली आहे.
अत्यंत नाजूक शारीरिक आणि मानसिक अवस्थेतून प्रवास करणाऱ्या प्रथमेशची पराकोटीची काळजी अत्यावश्यक आहे. डॉक्टरांचाही सल्ला तोच आहे. प्रथमेशला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले, ते त्याचसाठी! तो आयसीयूमध्ये असताना आयसीयूचे तमाम नियम पाळणे सर्वांसाठीच बंधनकारक ठरते. प्रथमेशच्या भल्यासाठी तर डोळ्यात अंजन घालून नियम पाळायलाच हवेत. तथापि आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी हे इस्पितळाच्या नियमांना सुरुंग लावून चोरपावलांनी प्रथमेशच्या कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी योजना आखतात. आश्रमाच्या कारभाराशी कुठलाही संबंध नसताना पत्नी आणि मुलीचाही शिरीष चौधरींनी त्यासाठी वापर केला. शिरीष चौधरींद्वारे करविल्या जाणाऱ्या असल्या मुद्यांचा संबंध थेट प्रथमेशच्या जगण्या-मरण्याशीच आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याची मागणी प्रथमेशच्या नातेवाईकांची आहे.
प्रथमेशचा गळा चिरल्यावर प्राथमिक उपचारानंतर अमरावतीच्या इर्विन इस्पितळातून ज्यांनी त्याला मांडीवर डोके ठेवून नागपूरपर्यंत मायेने नेले, त्याच्या नाका, तोंडातून पडणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या पाहूनही ज्यांनी मन पक्के करून त्याला जगण्याचे धैर्य दिले, त्या प्रथमेशच्या आत्या आणि प्रथमेशसाठी नागपुरात ट्रस्टींच्या गैरकायदा वागणुकीविरुद्ध खंबीरपणे किल्ला लढविणारी त्याची मामेबहीण अत्यंत चिंतीत मनाने 'लोकमत'जवळ प्रथमेशच्या जीवाला असलेला धोका कथन करीत होत्या. आश्रमातील ट्रस्टींची त्यांनी आतापर्यंतची अनुभवलेल्या षड्यंत्रकारी आणि बेकायदा वागणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमेशच्या जीवाला ट्रस्टींकडून गंभीर धोका आहे, असा त्यांचा निष्कर्ष आहे.
त्यांनी सांगितलेली एक घटना अत्यंत गंभीर आणि तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांनी मुळीच बेदखल करू नये, अशी आहे. आश्रम ट्रस्टचे कार्याध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या पत्नी, मुलगी आणि एक कॅमेरामन असे तिघेजण इस्पितळाच्या मागच्या दारातून प्रविष्ट झाले. त्यामागोमाग आश्रमातील आणखी काही पदाधिकारी तेथे पोहोचले. सर्व कामे सोडून प्रथमेशचे राखण करण्यासाठीच नागपुरात जातीने उपस्थित असलेल्या नातेवाईकांना त्यांनी मुद्दामच चहापाण्यात गुंतविले. चौधरी यांचे कुटुंबीय बेमालूमपणे नर्सच्या गैरहजेरीत प्रथमेशच्या कक्षात शिरले. बेकायदेशीररीत्या त्यांनी फोटो आणि व्हिडिओ शूट केले. काही अघटीत घडत असल्याची माहिती नर्सला कुणीतरी दिली. नर्स धावत आली. कक्षातील अक्षेपार्ह चित्र बघून नर्सने थेट डॉक्टरांकडे कूच केली. डॉक्टर धावत आले. त्यांनी बेकायदा वागणुकीवर तीव्र आक्षेप नोंदविला. प्रथमेशचे नातेवाईकही चहा सोडून कक्षाकडे झेपावले. प्रथमेशचा घात करण्याचाच डाव असल्याचा त्यांना संशय होता. पोलीस तक्रारीचा आग्रह त्यांनी डॉक्टरांना धरला. वातावरण कमालीचे तापले. डाव फसल्याचे लक्षात आल्यावर शिरीष चौधरी यांच्या पत्नीने प्रथमेशच्या बहिणीचे बराचवेळ पाय धरले. घटनेची वाच्यता न करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी त्यावेळी तक्रार न नोंदविल्याने प्रथमेशची बहीण, प्रतिमा राऊत यांनी थेट अमरावती एसपींचे घर गाठून तक्रार दिली.

Web Title: Prothamesh's cell thief accessed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.