समृद्धी महामार्ग; जमीन अधिग्रहणाला सुरूवात
By Admin | Updated: December 28, 2016 01:40 IST2016-12-28T01:40:03+5:302016-12-28T01:40:03+5:30
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलविण्याची क्षमता असलेल्या मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गाच्या कामाला

समृद्धी महामार्ग; जमीन अधिग्रहणाला सुरूवात
१५ गावांत पिल्लरची जागा निश्चित : शेतकऱ्यांना मिळणार पुढील आठवड्यात मोबदला
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलविण्याची क्षमता असलेल्या मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गाच्या कामाला पुढील आठवड्यात अधिक गती येणार असून १५ गावांत या महामार्गाचे पिल्लर, खांब उभारण्याची जागा निश्चित केली आहे़ दरम्यान तीन तालुक्यांतील ४३ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून जमिनीचा मोबदला मिळण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे़
मुंबई-नागपूर हा समृध्दी महामार्ग तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एक पाऊल पुढे टाकले. अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून हा महामार्ग जात असल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने जमीन अधिग्रहनाच्या कामाला वेग दिला आहे़ पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते या प्रकल्पाच्या संदर्भात आपल्या प्रशासकीय यंत्रणेकडून दररोज 'अपडेट' घेत आहेत.
१५ गावांत पिल्लरची जागा निश्चित
धामणगाव तालुक्यातील आष्टा, झाडा, झाडगाव, तळणी, निंभोरा बोडका, कळाशी, निंभोराराज, सावळा, आसेगाव, वाढोना, पठाणपूर, गणेशपूर, समशेरपूर, शेंदुरजना खुर्द, तळेगाव दशासर, हैयबतपूर या १५ गावातून हा सुपर एक्सपे्रस जात असल्याने या भाागातीलमहामार्गासाठी पिल्लर उभारणीची जागा निश्चित केली आहे़ नवीन वर्षात पुढील आठवड्यात चांदूररेल्वे तालुक्यातील निमगव्हाण, मांजरखेड, दानापूर, टिटवा, जवळा, धोत्रा, किरजवळा, खंबाळा, बोथ, अशा नऊ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील, वाढोणा रामनाथ, मंगरूळ चव्हाळा, पिंपळगाव, देऊळ गव्हाण, खेडपिंपरी, सालोड, लोहगाव, शिवणी, पाचोड, रसुलापूर, अदितापूर, कनी मिर्झापूर, पिंपरी पोच्छा, वेणी गणेशपूर, वाघोडा, गावनेर, तळेगाव, चिखली वैद्य, शहापूर, खेकडी, शेलूनटवा १९ गावाच्या परीसरातील पिल्लर उभारणीला सुरूवात होणार आहे़
जळगाव आर्वीतील जागा ताब्यात
राज्यात प्रथमच लॅन्ड पुलींग पद्धतीने जमीन अधिग्रहित केल्यानंतर महामार्गाच्या बाजूने ज्या स्मार्ट सिटीज समृद्धी केंद्र उभारला. त्याकरिता तालुक्यातील जळगाव आर्वी परिसरातील जमीन ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाक ले आहे. ही जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया या आठवड्यात पूर्ण होणार आहे़ त्याकरिता तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनी अहवाल तयार केला आहे़
जमीन अधिग्रहणाला सुरूवात
सुपर एक्सप्रेस हायवेसाठी लागणाऱ्या धामणगाव तालुक्यातील १ हजार ८१ हेक्टर जमीन ६३७, शेतकऱ्याकडून तर चांदूररेल्वे तालुक्यातील ५६२ हेक्टर शेतजमीन ३५५ शेतकरी व नांदगाव खंडेश्वर १ हजार ९९ हेक्टर ६६९ शेतकऱ्यांकडून अशी २ हजार ७४३़२३ हेक्टर शेतजमीन १ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहणास सुरूवात झाली आहे़ भूसंचनाच्या नवीन दराप्रमाणे या शेतकऱ्यांना जिरायती व बागायती शेतीचे दर मिळणार आहेत़