पाच बार अॅन्ड रेस्टॉरेंट्सचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: October 20, 2016 00:13 IST2016-10-20T00:13:00+5:302016-10-20T00:13:00+5:30
अवैध धंदे रोखण्यासाठी तयार करणाऱ्यात आलेल्या ‘स्ट्राईकिंग फोर्स’द्वारे मंगळवारी शहरातील विविध बिअरबार अॅन्ड रेस्टॉरेंटवर धाड टाकण्यात आली.

पाच बार अॅन्ड रेस्टॉरेंट्सचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव
४७ ताब्यात : ‘स्ट्राईकिंग फोर्स’ ची कारवाई
अमरावती : अवैध धंदे रोखण्यासाठी तयार करणाऱ्यात आलेल्या ‘स्ट्राईकिंग फोर्स’द्वारे मंगळवारी शहरातील विविध बिअरबार अॅन्ड रेस्टॉरेंटवर धाड टाकण्यात आली. यामध्ये विना परवाना दारू पिणाऱ्या ४७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त मंडलिक यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे यांच्या मार्गदर्शनात ‘स्ट्राईकिंग फोर्स’ने अवैध व्यवसायांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. मंगळवारी रात्री सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, बळीराम डाखोरे व पंडागळे यांच्या नेतृत्वातील विविध पथकाने गार्डन ग्लोरी, यश बिअरबार, आरती बिअरबार, गोल्डन आर्क आणि शाल बिअरबारवर छापे मारले. तेथील परमीटरूमच्या बाहेर विनापरवाना दारू पिताना ४७ नागरिक पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले. मात्र, बिअरबारच्या संचालकांवर कलम ८२ नुसार परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.
बार संचालकांची
जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
पोलीस विभागाकडून बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यासंदर्भात बार, हॉटेल तसेच रेस्टॉरेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. पोलीस विभागाकडून मनमानी पद्धतीने ही कारवाई केली जात असल्याने लाखो रूपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
शासकीय नियमांप्रमाणे व्यवसाय करीत असल्याचा दावा बार व्यावसायिकांनी केला असून याप्रकारे कारवाईचा अधिकार एक्साईजला आहे. मात्र, पोलीस विभाग अधिकारांचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोप असोसिएशनचा आहे. त्यामुळे या कारवाई तत्काळ थांबविण्यात याव्यात, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष लकी नंदा, सुरेश चांदवानी, सुशील पडोळे, गजानन राजगुरे, मदन जायसवाल, संजय छाबड़ा, नितिन जायसवाल, मंधार जायसवाल, रवी बागडे, कुलदीप भांबुरकर, अजय गुल्हाने, जीतेश साहू आदींनी केले आहे.