निरुपम यांच्या पितृत्वाचा मागितला पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 00:25 IST2016-10-07T00:25:19+5:302016-10-07T00:25:19+5:30
भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरात शिरून दहशतवादाचे प्रशिक्षण शिबिर उद्धवस्त केले

निरुपम यांच्या पितृत्वाचा मागितला पुरावा
युवा सेना आक्रमक : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरात शिरून दहशतवादाचे प्रशिक्षण शिबिर उद्धवस्त केले त्याचा पुरावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मागितला, असे सांगत युवा सेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांना निवेदन देऊन माहितीच्या अधिकारात संजय निरुपम यांच्या पितृत्वाचाच पुरावा मागितला. एकीकडे सीमेवरील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश अस्वस्थ झालेला आहे.
पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिर स्थळांवर सर्जिकल स्ट्राईक केला. एकप्रकारे भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून त्यांना मारले. मात्र काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. जवान सीमेवर प्राणाची बाजी लावतात.
देशवासीयांची सुरक्षा करणाऱ्या जवानांना जर पुरावे मागितले जात असतील तर निरुपम हे त्यांच्या पित्याचेच चिरंजीव आहेत की नाही, त्याची माहिती माहितीच्या अधिकारात युवा सेनेला देण्यात यावी, अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात युवासेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे, ललिता झंझाळ, आशिष दारोकार, मुन्ना शर्मा, राहुल माटोळे, प्रवीण विधाते, विक्रम लाड, मोहन एखडे, विशाल एस.,मनोज ठवकर, सागर मते, कृणाल मंजलवार, वैभव मोहोकार, गौरव गतफणे, कौस्तुभ कोरडे, प्रणव डांगे, स्वराज ठाकरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)