प्रचाराची रणधुमाळी सुरु
By Admin | Updated: October 1, 2014 23:15 IST2014-10-01T23:15:49+5:302014-10-01T23:15:49+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ६७ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. आता १३५ उमेदवार मैदानात असून

प्रचाराची रणधुमाळी सुरु
चिन्हांचे वाटप : नेत्यांचे दौरे, सभांची धूम, सिलेब्रिटींचे रोड शो
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ६७ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. आता १३५ उमेदवार मैदानात असून या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला १९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे.
अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रीय व राज्य पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप झाले. गुरुवारपासून अपक्ष उमेदवारांची प्रचार मोहीम सुरु होईल. १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार असल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी नेत्यांचे दौरे, सभा व सिलेब्रिटींचे रोड शो आदींचे नियोजन आखले आहे. दोन दिवसांपूर्वीच नितीन गडकरी, राज ठाकरे अमरावतीत येऊन गेलेत. गुरुवारी अजित पवार येत आहेत. दसरा आटोपताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या नेत्यांचे प्रचार दौरे राहणार आहेत.
दोन दिवसांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सभा होणार आहेत. राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी शरद पवार यांच्याही सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून मिळाली आहे. नरेंद्र मोदी यांची १२ आॅक्टोबर रोजी अमरावतीत जाहीर सभा आयोजित करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची प्रचारसभा व रोड शो होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आ. जोगेंद्र कवाडे यांच्याही सभा होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, रामदास आठवले हे प्रचार सभा घेतील. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, मनोहर जोशी, रामदास कदम यांच्याही सभा होतील. बसपच्या नेत्या मायावती, विलास गरुड तर भारिप- बमसंचे प्रकाश आंबेडकर यांच्यादेखील सभा येथे होणार आहेत. नेत्यांच्या सभांनी मैदान गाजविण्याची रणनीती आखताना राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांपर्यत पोहचण्यासाठी सिलेब्रिटींना आणण्याची तयारी चालविली आहे.