खासगी संस्थांच्या शिक्षकांना प्रचार बंदी
By Admin | Updated: September 27, 2014 00:55 IST2014-09-27T00:55:54+5:302014-09-27T00:55:54+5:30
खासगी संस्थांचे शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वर्गांना राजकीय पक्षांचे कामकाज व प्रचार यावर बंदी घालण्यात आली आहे.

खासगी संस्थांच्या शिक्षकांना प्रचार बंदी
अमरावती : खासगी संस्थांचे शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वर्गांना राजकीय पक्षांचे कामकाज व प्रचार यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे शिक्षक सध्या राजकीय प्रचारापासून अलिप्त आहेत. मात्र यांच्या पडद्यामागून हालचाली सुरुच आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश अनुदानित खासगी शाळा ह्या राजकीय व्यक्तींच्या आहेत. त्यामुळे निवडणूक म्हटली की शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा प्राचारात मोठा सहभाग असायचा. विशेष म्हणजे ह्या राजकीय मंडळींना कार्यकर्त्यापेक्षा अधिक विश्वास हा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच हा वर्गदेखील सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी राजकीय प्रचारात खुलेआम राहायचा. परंतु आता असे करता येणार नाही. आयोगाद्वारा ही बाब गंभीरतेने घेण्यात आली आहे. प्रचार करताना आढळल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरुन गुन्हा दाखल होणार आहे. शिक्षण विभागाने याविषयीचे आदेश बजावले आहेत. एखाद्या शिक्षक किंवा प्राध्यापका- विरोधात प्रचारविषयक तक्रार दाखल झाल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे राजकारणात पुढे-पुढे करण्यात माहीर असणाऱ्या या वर्गाची मात्र गोची झाली आहे. (शहर प्रतिनिधी)