पाया बांधकामासाठी प्रकल्पग्रस्तांना निधी

By Admin | Updated: February 5, 2016 00:21 IST2016-02-05T00:21:49+5:302016-02-05T00:21:49+5:30

निम्नपेढी प्रकल्पमधील अळणगाव येथील ग्रामस्थांना पुनर्वसित गावठाणात घराच्या पायाबांधणीसाठी कमीतकमी १ लाखाहून अधिकचा अतिरिक्त निधी मिळणार आहे.

Project funding for foundation construction | पाया बांधकामासाठी प्रकल्पग्रस्तांना निधी

पाया बांधकामासाठी प्रकल्पग्रस्तांना निधी

संयुक्त बैठकीतील निर्णय : अळणगाव ग्रामस्थांना होणार लाभ
अमरावती : निम्नपेढी प्रकल्पमधील अळणगाव येथील ग्रामस्थांना पुनर्वसित गावठाणात घराच्या पायाबांधणीसाठी कमीतकमी १ लाखाहून अधिकचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. गुरुवारी यासंदर्भात सिंचन भवनामध्ये पाटबंधारे, भूसंपादन आणि पुनर्वसन यंत्रणेची संयुक्त बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
आ.सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्य अभियंता लांडेकर, अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राठी, पुनर्वसन या भूसंपादन अधिकारी जयंत देशपांडे यांच्यासह निम्नपेढी, बोरप्रकल्प आणि बोर्डीनाल्या प्रकल्पासंबंधीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
अळणगाव येथील ग्रामस्थांनी या बैठकीत पुनर्वसन तथा भूसंपादनासोबत घराच्या पायासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. कठोरा शेतशिवारात शेत असलेल्या अळणगाव येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनावेळी घराचा पाया बांधण्यासाठी अतिरिक्त रक्कम देण्यात यावी. येथील संपूर्ण जमीन काळ्या मातीची असून येथे बांधकामासाठी अधिक खोलीचा पाया खोदून बांधकाम करावे लागते. ही रक्कम घरांच्या मोबदल्यासोबत देण्यात यावी, अशी विनंती प्रकल्प अधिकारांकडून करण्यात आली. यावेळी आ. देशमुख यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सचिवांशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्याची सूचना केली. बरहुकूम घराच्या पाया बांधकामासाठी अतिरिक्त रक्कम मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे या बैठकीदरम्यान सांगण्यात आले. निम्नपेढी प्रकल्पाबाधित असलेल्या अळणगाव येथील ग्रामस्थांना त्यांच्या घराचा मोबदला ८ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावीत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन तथा पुनर्वसन अधिकारी जयंत देशपांडे यांनी बैठकीदरम्यान दिली. घराच्या पायाबांधकामासाठी अतिरिक्त रक्कम मिळण्याबाबतचा प्रस्ताव अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सु.गो. राठी यांनी सांगितले. बैठकीला अळणगाव येथील सतीश मेटांगे, सुधीर दुर्गे, मंगेश मानकर, पंजाब दुर्गे, किशोर महल्ले, भाऊराव कापडे, रामराव चुडे, बबलू बोडके, अजय माथुरकर, संदीप मेटांगे, अन्नूमियां, आदिचीं उपस्थिती होती. जिल्ह्यातील रखडलेल्या सर्वच प्रकल्पाच्या अडचणींवर या बैठकीत मंथन करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Project funding for foundation construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.