वृक्षलागवडीच्या खड्डे मोहिमेला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:54 IST2018-06-13T21:54:05+5:302018-06-13T21:54:28+5:30
राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे.

वृक्षलागवडीच्या खड्डे मोहिमेला गती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत २६ लाख खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी बांगर यांनी मंगळवारी एकूण ३० यंत्रणांच्या प्रमुखांची १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने बैठक घेतली. यात वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक हेमंत मिणा, सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसरामसह अनेक अधिकारी हजर होते. यावेळी जिल्हाधिकारी बांगर यांनी राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या धर्तीवर ‘वनयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थावर विशेषत: जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना करून दिली. १ जुलैपासून होणारी वृक्षलागवड ही ‘फोटोसेशन’ पुरती असू नये, यासाठी नियम, निकषाचा आधार राहणार आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरणाकडे वृक्ष लागवड कार्यक्रमांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी तर उपवनसंरक्षक हे प्रमुख म्हणून धुरा सांभाळतील.
३५ लाख रोपांची निर्मिती
१ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या १५ नर्सरींमध्ये २० लाख रोपांची निर्मिती झाल्याची माहिती येथील सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वनविभागाकडे १५ लाखांवर रोपे आहेत. वृक्षलागवडीसाठी पुरेशी रोपे असून, त्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास प्रदीप मसराम यांनी व्यक्त केला आहे.
१३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा असू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य सामाजिक संघटनांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती.