लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'हॅलो, आम्ही तेलंगणा पोलिस आणि सीआयडी मुंबई आहोत. आपण बंगळुरूमध्ये एक सिम कार्ड विकत घेतले. त्याचा गैरवापर झाला आहे. बऱ्याच महिलांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणूनच मानवतस्करीचे प्रकरण आपल्याविरुद्ध नोंदवले गेले आहे,' असे धमकावत एका प्राध्यापकाला डिजिटल अरेस्ट करीत त्यांच्याकडून १४.३० लाख रुपये उकळण्यात आले.
प्राध्यापकांना २५ लाख रुपये द्यायचे होते. त्यासाठी वारंवार कॉल करण्यात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावेळी डिजिटल अरेस्टचे जाळे फेकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शांताराम चव्हाण (५६, रा. अनंत नगर, नवसारी) असे चिखलदरा येथे कार्यरत व फसवणूक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. त्यांना २१ एप्रिल रोजी सकाळी ११:२७ वाजता वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉटस्अॅपवर व्हिडीओ कॉल प्राप्त झाले.
महिलांच्या तक्रारींवरून मानवतस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी लागेल. शिक्षेपासून वाचायचे असेल, तर २५ लाख रुपये ऑनलाइन पाठवा, अशी धमकी त्या व्यक्तीने शांताराम चव्हाण यांना दिली. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने घाबरलेले प्रा. चव्हाण हे त्या व्यक्तीच्या पूर्णपणे कह्यात गेले. त्यांनी तब्बल १४ लाख ३० हजार रुपये एचडीएफसी बँकेच्या अनोळखी खात्यावर जमा केले.
"तक्रारदार प्राध्यापकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरण नोंदवले गेले. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अमरावती शहरातील डिजिटल अरेस्टचे हे तिसरे प्रकरण आहे."- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक तथा प्रभारी, सायबर पोलिस स्टेशन