उत्पादन खर्च वाढला, हमीभाव मात्र जुनाच!
By Admin | Updated: July 19, 2014 23:39 IST2014-07-19T23:39:55+5:302014-07-19T23:39:55+5:30
बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्यासोबत मजुरीच्या खर्चात कित्येक पटींनी वाढ झालेली असताना सोयाबीन, भुईमुगाच्या आधारभूत किमतीमध्ये २०१४-१५ या हंगामासाठी वाढ करण्यात आलेली नाही.

उत्पादन खर्च वाढला, हमीभाव मात्र जुनाच!
सोयाबीनला ठेंगा : कापूस, तूर, धानाला ५० रूपयांची वाढ
गजानन मोहोड - अमरावती
बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्यासोबत मजुरीच्या खर्चात कित्येक पटींनी वाढ झालेली असताना सोयाबीन, भुईमुगाच्या आधारभूत किमतीमध्ये २०१४-१५ या हंगामासाठी वाढ करण्यात आलेली नाही. कापूस, तूर, धानाच्या किमतीमध्ये फक्त ५० रूपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी व गारपीट या संकटांनी आधीच शेतकरी गारद झाला असताना त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.
२०१३च्या खरीप हंगामात अतिवृष्टी, गारपीट व परतीच्या पावसामुळे पिकांचे सरासरी उत्पन्न ४० ते ५० टक्क्यांनी घटले. सोयाबीन गंजीतच सडले, शेंगांमध्ये बिजांकुरण झाले. यामुळे २५६० या हमीभावांपेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री झाली. पावसात भिजल्याने सोयाबीनची प्रतवारी कमी झाली. उगवणशक्तीदेखील ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली. पेरणीसाठी ३० ते ४० टक्क्यांनी अधिक बियाणे लागणार आहे.
सोयाबीनचे उत्पन्न कमी, उत्पादन खर्चात वाढ
सोयाबीनची उगवणशक्ती ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याने अधिकचे बियाणे शेतकऱ्यांना लागणार आहे. एकरी ४ हजारांचे बियाणे, १हजार रूपये पेरणी खर्च, ३हजार रूपयांची खते, फवारणी औषधी, ३हजार रूपये निंदण, कापणी, मळणी व मजुरी असा एकरी ११ हजार रूपये खर्च यंदा अपेक्षित आहे. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे २५ ते ३० टक्क्यांनी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पन्न शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षाही कमी राहणार आहे.
सरसरी उत्पन्न यंदा कमी
यंदा बियाण्यांची बॅग ३०० ते १००० रूपयांनी वाढली आहे. काळ्या बाजारात याच्या दुप्पट दाम शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे, यंदाच्या हंगामात ५० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. ज्यांनी पेरणीचे धाडस केले त्याच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. आठ-पंधरा दिवसांनंतर येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा मशागत करावी लागत आहे, बियाण्यांवर वाढलेला खर्च, पेरणीसाठी पुन्हा वाढीव खर्च, मजुरांचा वाढलेला खर्च यामुळे शेतकरी पेरणीआधीच जेरीस आला आहे. पेरणीला दीड महिना उशीर होत असल्याने पिकाच्या वाढीला पुरेसा काळ मिळत नाही, तसेच उगवणशक्ती अभावी ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याची रोपांची संख्या यामुळे पेरणीपूर्वीच सरासरी उत्पन्नात कमी येणार आहे, किमान आधारभूत किमतीत वाढ होऊन काहीसा भार हलका होईल या अपेक्षेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर आधारभूत किमतीत वाढ करण्यात येते. कपाशीचा उत्पादन खर्च ६०४० रूपये प्रति क्विंटल येत असल्याचे आयोगाने मान्य केले आहे. प्रत्यक्षात कपाशीसाठी शिफारस ५० रूपयांची केली.