एकाच शिबिरात सुटणार समस्या
By Admin | Updated: September 20, 2015 00:36 IST2015-09-20T00:36:30+5:302015-09-20T00:36:30+5:30
सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी महाराजस्व अभियानाची अमंलबजावणी करण्यात येत आहे.

एकाच शिबिरात सुटणार समस्या
पालकमंत्री : चांदूररेल्वे तालुक्यात महाराजस्व अभियानाला सुरुवात
अमरावती : सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी महाराजस्व अभियानाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. गरीब जनतेचे महसूल व इतर शासकीय विभागाशी संबंधित अडचणी व प्रश्न एकाच ठिकाणी विस्तारित समाधान योजना शिबिरात सोडविण्यात येतात. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
चांदूररेल्वे येथील सावित्रीबाई यादव सभागृहात महाराजस्व अभियांन अंतर्गत आयोजित विस्तारित समाधान शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. वर्धेचे खा. रामदास तडस, आ.वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, नगराध्यक्ष अंजली अग्रवाल, न.पा. सभापती किशोर झाडे, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्व योजनांची माहिती गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, या उदात्त हेतूने महाराजस्व अभियान सुरु करण्यात आले आहे. शासकीय अधिकारी शासनाचा चेहरा असून समाजातील प्रत्येक घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावा-गावांत जनजागृती करावी. नागरिकांच्या महसूलविषयक कागदपत्रांची पूर्तता तातडीने होत असल्याने प्रशासन अधिक लोकाभिमुख होत आहे. ग्रामस्थांनी अशा समाधान शिबिरातून आपले प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. अन्न सुरक्षा योजनेचा लाभ जिल्ह्यांतील दोन हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे. प्रधानमंत्री विमा योजनेव्दारे फक्त १२ रुपयांत दोन लक्ष रुपयांच्या विम्याची सोय करून दिली आहे. शासनामार्फत १० हजार ६०० शेतकऱ्यांना विहिरीसाठी वीज जोडणी कनेक्शन देण्यात आले. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा सुलभ व्हावी यासाठी सुमारे १७०० सोलर पंप राज्य शासनाव्दारे पुरविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील व्याज माफ करण्यात आले आहे. शिबिरात विविध शासकीय विभागांच्या स्टॉल्सची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. ग्रामस्थांनी प्रत्येक योजनेंसंबंधी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख होण्यासाठी महाराजस्व अभियान सुरु केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना रमाई घरकूलचे धनादेश, कृषी पंपाचे वाटप, एल.पी.जी गॅस कनेक्शन व शेगडी, दाखले, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोठया संख्येने तालुक्यातील जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, महिला, पुरुष व विद्यार्थीगण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विविध मागण्यांची आमदारांकडून मांडणी
यावेळी सोयाबीन पिकांच्या नुकसान भरपाई, ओव्हर लोड झालेल्या डीबी बदलून मिळणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांचा लाभ खऱ्या गरजुंना मिळणे, आरोग्य सुविधा पुरविणे आदी महत्त्वाच्या बाबींच्या मागण्या आमदार वीरेंद्र जगताप यांनी यावेळी मांडल्या.
अभियानात ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक
शिबिरात शासकीय विभागांचे एकूण ३६ स्टॉल्स उभारण्यात आले आहे. यामध्ये महसूल, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, मुद्रांक नोंदणी विभाग, सामाजीक वनीकरण, परिवहन यासह इतर शासकीय विभागांचा समावेश आहे. सुमारे २०० योजनांची माहिती या माध्यमातून ग्रामस्थांना मिळणार आहे. जिल्हयांत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ४५०० कामे पूर्ण करण्यात आली. याचा २५० गावांना लाभ मिळाला. यावर्षी ३५० गावांना जलयुक्त शिवार अभियानात सहभागी करणार आहे. याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.