महापालिका मांडणार राज्यमंत्र्यांसमोर समस्या
By Admin | Updated: December 25, 2014 23:26 IST2014-12-25T23:26:03+5:302014-12-25T23:26:03+5:30
राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा महापालिकेत २७ डिसेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

महापालिका मांडणार राज्यमंत्र्यांसमोर समस्या
अमरावती : राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे व नगरविकास, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा महापालिकेत २७ डिसेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या आयोजनाचा सर्वसाधारण सभेत ठरावसुद्धा मंजूर केला आहे. मात्र महापालिकेत दोन राज्यमंत्री येत असल्याचे औचित्य साधून अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समस्यांची यादी मांडण्याची तयारी चालविली आहे.
महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. एका अधिकाऱ्याकडे विविध कार्यभार सोपवून आयुक्त डोलारा सांभाळत आहे. एकूण ८०४ पदे रिक्त आहेत. महिन्याकाठी साडेआठ कोटी रुपये कोणतेही विकासकामे न करता महापालिकेला लागते. अशातच शासनाने एलबीटी बंदची घोषणा केल्याने तिजोरीत येणारी रक्कम पूर्णत: ठप्प आहे. उत्पन्नाचे स्त्रोत आटले असून कारभार कसा हाताळावा, या विवंचनेत अधिकारीवर्ग आहे. एकूण २८० कोटी रुपये कंत्राटदार, पुरवठादार, कर्मचाऱ्यांची देणी आहे. अशातच सहावे वेतन आयोग लागू करण्याचे ओझे महापालिकेवर कायम आहे. तिजोरीत ठणठणाट आणि वेतनाची बोंबाबोंब अशा अवस्थेत प्रशासकीय डोलारा सांभाळताना आयुक्तांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकित असल्याने त्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेत एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या असताना अशातच दोन राज्यमंत्र्यांना सत्कारासाठी बोलाविण्यात आले आहे. ही सुवर्ण संधी साधून महापालिकेचा डोलारा व्यवस्थित करण्यासाठी विशेष अनुदान आणि रिक्त पदे भरती करण्याबाबत शासनाने मंजुरी द्यावी, असे निवेदन देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. समस्या मांडण्यासाठी अधिकारी दोन पावले पुढे सरकत असताना पदाधिकारही मागे नसल्याचे चित्र आहे. महापौर चरणजित कौर नंदा, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता सुनील काळे, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, अविनाश मार्डीकर, अजय गोंडाणे, विरोधीपक्षनेता दिगंबर डहाके आदी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील समस्यांची यादी तयार करुन ती मंत्र्यांच्या पुढ्यात ठेवण्याची रणनीती आखली आहे. ना. प्रवीण पोटे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दायित्वाची जबाबदारी असून नगरविकास राज्यमंत्री म्हणून रणजित पाटील यांच्याकडे कैफियत मांडण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी सज्ज झाले आहेत. सत्कार सोहळा आटोपताच एका छोटेखानी बैठकीत समस्यांचा पाढा मंत्र्याच्या पुढ्यात मांडला जाईल. या दोन्ही राज्यमंत्र्यांचा सत्कार महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे