विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:13+5:302020-12-11T04:38:13+5:30

परीक्षा विभागात खिडक्यांवर हजारो विद्यार्थ्यांची गर्दी, जुन्या गुणपत्रिका जमा करण्याची लगबग अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्तापीठाने अंतिम वर्षाचे ...

The problem of 'withheld' results persists in the university | विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या कायम

विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या कायम

परीक्षा विभागात खिडक्यांवर हजारो विद्यार्थ्यांची गर्दी, जुन्या गुणपत्रिका जमा करण्याची लगबग

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्तापीठाने अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात (विथहेल्ड) आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पालकांसह जुन्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. गत आठवड्यापासून विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षांचे नियोजन केले होते. ३ नोव्हेंबरपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बहुतांश सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या परीक्षांचे गुणपत्रिका अप्राप्त असल्याने अशा विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहे. अशातच अनेक महाविद्यालये, विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी ४ डिसेंबर ही तारीख अंतिम निश्चित केल्यामुळे आणखीच गोंधळ उडाला. दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने पदवी,पदव्युत्तर प्रवेशासाठी ३० डिसेंबर ही अखेरची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मानला जात आहे. मात्र, गुणपत्रिका महाविद्यालयातून अप्राप्त असल्याने विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यास विलंब लावत आहे. त्यामुळे बीएस्सी सत्र ६, सत्र ३ चे गुणपत्रिका जमा नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे निकाल सर्वाधिक रोखण्यात आल्याची माहिती आहे. फार्मसी, कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाही ‘विथहेल्ड’ निकाल समस्येचा सामना करावा लागत आहे.

----------------------------

विद्यापीठ, महाविद्यालयांत समन्वयाचा अभाव

गत १० दिवसांपासून ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी १०० ते २०० कि.मी.चा प्रवास करुन विद्यार्थी पालकांसह विद्यापीठ गाठत आहे. परीक्षा विभागातील खिडक्यांवर सकाळपासून सायंकाळपर्यंत उपाशी राहून विद्यार्थी जुने सत्राच्या गुणपत्रिका जमा करीत आहे. अगोदरच महाविद्यालयात गुणपत्रिका जमा केल्या असताना त्या गायब झाल्याची ओरड आहे. एकुणच निकाल रोखण्यात आल्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांत समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते.

-------------------------

कोट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘टाईमबॉन्ड’ अंतिम सत्राचे निकाल जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार परीक्षा विभागाने जबाबदारी पार पाडली आहे. आता जुने सत्राच्या गुणपत्रिका प्राप्त होताच सदर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करून गुणपत्रिका दिली जात आहे. महाविद्यालयाने वेळेपूर्वी गुणपत्रिका जमा केल्या नाहीत.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.

---------------------

यापूर्वी महाविद्यालयात गुणपत्रिका जमा केल्या आहेत. तरीही निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात येत असल्याचे आश्चर्य आहे. आता आम्हाला विद्यापीठात अंतिम वर्षाची गुणपत्रिका मिळविण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहे.

- श्रेयस शिरभाते, विद्यार्थी, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती

Web Title: The problem of 'withheld' results persists in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.