वैरणाची समस्या ऐरणीवर; १० लाखांवर पशुधन धोक्यात
By Admin | Updated: July 6, 2014 23:37 IST2014-07-06T23:37:21+5:302014-07-06T23:37:21+5:30
गेल्या हंगामात खरिपाचे सडलेले सोयाबीन, अकाली पाऊस व गारपिटीमुळे उध्वस्त झालेला गहू, हरभरा आणि काळवंडलेली तूर यामुळे जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वीच जनावरांच्या चाऱ्याची

वैरणाची समस्या ऐरणीवर; १० लाखांवर पशुधन धोक्यात
अमरावती : गेल्या हंगामात खरिपाचे सडलेले सोयाबीन, अकाली पाऊस व गारपिटीमुळे उध्वस्त झालेला गहू, हरभरा आणि काळवंडलेली तूर यामुळे जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वीच जनावरांच्या चाऱ्याची चणचण भासू लागली होती. यंदाचा हंगाम सुरू होताच महिनाभरापासून पाऊस गायब असल्याने जनावरांसाठी हिरवा चाराच उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्या गोठ्यात बेगमी केलेले कुटारही नाही. जंगलात हिरवा चारा अन् पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील लाखावर पशुधन धोक्यात आले आहे. प्राणापलिकडे जपलेले, कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळलेले पशुधन डोळ्यांसमोर उपाशी मरताना पाहण्याचे दुर्भाग्य यंदा बळीराजाच्या वाट्याला येते की काय, अशी स्थिती आहे.
‘ह्या नभाने ह्या भूईला दान द्यावे
आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे।
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडूनी जावे।।
अशा प्रकारे शेतकरी माऊलीला आर्जव करू लागला आहे. खरीप २०१३ च्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे कंबरडे आधीच मोडले.जिल्ह्यात शासनाच्या दत्तक ग्राम कामधेनू योजनेचे पशुधन देखील धोक्यात आले आहे.
जनावरासाठी चारा उपलब्ध होणे महत्वाचे आहे. पावसामुळे वैरण सडले असताना सुध्दा कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. वैरण विकास कार्यक्रम यापूर्वीच राबविला असता तर जनावरांसाठी पौष्टीक हिरवा चारा उपलब्ध झाला असता. तुर्तास शेतीपूरक दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळेच गायी, म्हशी, बैलजोड्या विक्रीसाठी येत आहेत. जिल्ह्यातील लाखांवर पशुधनाला लागणाऱ्या वैरणापैकी ६० टक्के वैरण सोयाबीनची मळणी झाल्यानंतर निघणाऱ्या कुटारातून मिळते. परंतु मागील हंगामात सोयाबीन व नंतर रबीचा गहू, हरभरा सडल्यामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वैरणाची समस्या असताना निकृष्ट वैरणावर युरीया प्रक्रिया करून ते वैरण पौष्टीक बनविण्यासाठी कुठलेही प्रयत्न कृषी विभागाने केलेले नाहीत. पशुसंवर्धन विभाग देखील कुंभकर्णी झोपेत आहे. वैरण विकास कार्यक्रमासोबतच वैरण प्रक्रिया कार्यक्रम राबविला असता तर वैरणाची पौष्टीकता १६ टक्क्यांनी वाढून अधिकतम प्रथिनेयुक्त चारा जनावरांना उपलब्ध झाला असता.
जनावरांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी, दुभत्या जनावरांपासून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी तसेच गाई, बैल, म्हशींच्या शरीरांची समाधानकारक वाढ होण्यासाठी त्यांचा आहार समतोल असणे महत्वाचे असते. मात्र, सध्या हिरवा चाराही नाही किंवा शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन, तूर, हरभरा व गहू यांचे कुटारही नाही. त्यामुळे वैरणाअभावी पशुधन धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पावसाने महिन्यापासून दडी मारल्याने खरीप २०१४ चा हंगाम आधीच अडचणीत आला आहे. त्यामध्ये आता वैरणाची समस्या समोर उभी ठाकल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पशुधन वाचविण्याची कसरत बळीराजा करीत आहे