भावी शिक्षकांसमोर बेरोजगारीची समस्या
By Admin | Updated: November 8, 2014 00:47 IST2014-11-08T00:47:02+5:302014-11-08T00:47:02+5:30
शिक्षक होऊन रोजगाराचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने डी.एड. आणि बी.एड. ची पदविका धारण केलेल्या युवकांवर बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली.

भावी शिक्षकांसमोर बेरोजगारीची समस्या
सुनील देशपांडे अचलपूर
शिक्षक होऊन रोजगाराचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने डी.एड. आणि बी.एड. ची पदविका धारण केलेल्या युवकांवर बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली.
१५ वर्षांपूर्वी डी.एड. प्रशिक्षण झाल्याबरोबर हमखास नोकरी मिळायची. ग्रामीण भागातील बहुतांश तरूण डी. एड. होऊन शिक्षक व्हायची स्वप्ने रंगवायचे. डी. एड. ला नंबर लागला आयुष्याचे अर्धे समाधान प्राप्त होत असे. मात्र अलीकडच्या काळात अध्यापक महाविद्यालयाच्या सुळसुळाटामुळे डी.एड. धारकांची मोठी फौज निर्माण झाली आहे. नोकरी मिळत नसल्याने आता भावी शिक्षक बेरोजगार झाल्याने मिळेल ते काम करण्यात धन्यता मानत आहेत. अनेक भावी शिक्षक काळी-पिवळीवर चालक आहेत. काही आॅटो चालवतात तर काहींनी पानटपरी किराणा दुकान लावले आहे.
आधी याच डीएडधारकांना मोठा मान होता. शिक्षक होऊन ग्रामीण भागात ज्ञानार्जनाचे काम ही मंडळी करीत होती. काही वर्षांपूर्वी खासगी संस्थांना डी.एड., बी.एड. विद्यालयांच्या खिरापती सरकारने वाटल्या. परिणामी गल्लीबोळात डी.एड., बी.एड. विद्यालयाचे पीक आले. पूर्वी ७० टक्क्यांवर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना डी.एड.ला प्रवेश मिळायचा. मात्र खासगी अध्यापक विद्यालयांनी कमी गुण असणाऱ्यांना प्रवेश देणे सुरू केल्याने विद्यार्थी संख्या कमी आणि अध्यापक विद्यालयेच जास्त, अशी स्थिती झाली. आता अध्यापक विद्यालयांसाठीना विद्यार्थी मिळविताना शिक्षकांची भटकंती होत आहे.
अशा परिस्थितीत शेकडो युवक डी.एड. ची पदविता घेऊन बाहेर पडले तरी त्यांना कोणी विचारत नाही. अलीकडे डी.एड. उमेदवारांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली. गुणवत्ता यादीत स्थान मिळत नसल्याने बेरोजगार शिक्षकांची फौज गावागावांत उभी राहिली आहे. ज्यांच्याकडे शेती आहे ते शेतात राबतात कुणी दुग्ध व्यवसाय तर कुणी कुक्कुटपालन करीत आहेत. ज्यांच्याकडे शेती नाही असे भावी शिक्षक आपल्या व्यवसायाशी संबंधित नसलेल्या ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह करताना दिसतात.
डी.एड. धारकांची ही दयनीय अवस्था पाहून आता तरूणांनी डी.एड.कडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अध्यापक विद्यालये बंद पडण्याची वेळ आली आहे. हीच अवस्था बी.एड. धारकांची झालेली आहे. कधीकाळी हमखास नोकरी देणारी डीएड विद्यालये आता बेरोजगारीची फौज निर्माण करणारे कारखाने बनल्याची चर्चा सामान्य जनतेत आहे. अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात शेकडो डी.एड.धारक विद्यार्थी नोकरी लागेल, शिक्षक होऊ या आशेवर आहेत. सध्या ते रोजगार मिळविण्यासाठी मिळेल ते काम करीत आहेत.