तिच्या सांगण्याहून प्रियकरानेच केली चोरी
By Admin | Updated: February 28, 2015 00:36 IST2015-02-28T00:36:12+5:302015-02-28T00:36:12+5:30
प्रियकराला सांगून तिने आपल्याच घरी चोरी करवून घेतल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. माधवी विहारात पाच दिवसांपूर्वी २ लाख ८० हजारांची घरफोडी झाली होती.

तिच्या सांगण्याहून प्रियकरानेच केली चोरी
अमरावती : प्रियकराला सांगून तिने आपल्याच घरी चोरी करवून घेतल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. माधवी विहारात पाच दिवसांपूर्वी २ लाख ८० हजारांची घरफोडी झाली होती. तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरासह त्या मुलीलाही अटक केली आहे.
माधवी विहारात २२ फेब्रुवारी रोजी भरदिवसा २ लाख ८० हजारांची चोरी झाली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला होता. याच्या चौकशीतून पोलिसांनी पॅराडाईज कॉलनीतील रहिवासी शेख वसीम शेख रहमत (३२) याला अटक केली असून त्यांच्याकडून १०० ग्रॅमचे सोन्याचे ऐवज जप्त केले आहे. आरोपी हा वाहन चालक असून तो विवाहित आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन थोरात, प्रणय वाघमारे, दीपक श्रीवास, संदीप देशमुख, चैतन्य रोकडे यांच्या पथकाने गुप्त माहितीवरुन आरोपी शेख वसीम याची चौकशी केली. त्यामध्ये मुलीच्या सांगण्याहून ही चोरी केल्याची आरोपीने कबुली दिली.
माधवीनगरातील २७ वर्षिय मुलगी डेंटल कॉलेजची विद्यार्थिनी आहे.घटनेपूर्वीही तिने प्रीयकरासाठी सोन्याचे दागिने चोरी केले होते. तिने प्रियकराला भेटण्याकरिता कांता नगरात एक खोली भाड्याने घेतली आहे. त्या ठिकाणी दोघेही भेटत होते. चोरी करण्यापूर्वी तिने प्रियकराला कुलुपाची चावी दिली होती. त्यानंतर ती कुटुबींयासोबत लग्नकार्यात गेली. प्रियकराने २ लाख ८० हजारांचे दागिने लंपास केले. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऐवज व पैसे जप्त केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती मुलगी लग्न करणार होती. (प्रतिनिधी)