अतिक्रमण मोहिमेत हटणार काय? : पालिका यंत्रणेला सवाल
वरूड : स्थानिक पांढुर्णा चौक परिसरात एका कॉम्प्लेक्सला उच्चदाब वीजपुरवठा देण्याकरिता शासकीय जागेत खासगी विद्युत रोहीत्र लावण्यात आले आहे. तूर्तास शहरात अतिक्रमण मोहीम धडाक्याने सुरू असल्याने शासकीय जागेतील खासगी रोहीत्र हटणार का, असा सवाल वरूडकरांचा आहे. पालिका यंत्रणेने आता बोटचेपी भूमिका घेऊ नये, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.
पांढुर्णा चौक शारदा कॉलनीलगत अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याला एक जोडरस्तादेखील आहे. या महामार्गाच्या बाजूला शासकीय जागेत खासगी मालकीचे रोहीत्र उभारण्यात आले आहे. वर्दळीचा रस्ता असल्याने एखाद्यावेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याने आमरस्त्याच्या बाजूला काही जरी उभारले तरी वेळीच कारवाई केली जाते. परंतु राष्ट्रीय महामार्गालगत विद्युत रोहित्र लावून अपघाताची शक्यता असतानाही महावितरण, नगरपालिका तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष कसे, असे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधिताला १५ जानेवारी रोजी त्यांच्या स्वत:च्या जागेवर थ्री फेज वीजपुरवठा घेण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. या प्रमाणपत्रात रोहीत्र लावण्याचा उल्लेख नसून हे रोहीत्र शासकीय जागेत व्हायब्रेशन एरियामध्ये लावण्यात आले. आता शहरात अतिक्रमण निर्मुलन मोहीम धडाक्यात सुरू आहे. शासकीय जागेतील अतिक्रमणे काढली जात आहे. या मोहिमेत खासगी मालकीचे विद्युत रोहीत्र काढणार काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.