देवमाळीत खासगी कोविड रुग्णालय प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST2021-03-01T04:14:35+5:302021-03-01T04:14:35+5:30
अनिल कडू परतवाडा : शहराचाच एक भाग ठरलेल्या अचलपूर तालुक्यातील देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात खासगी कोविड रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले ...

देवमाळीत खासगी कोविड रुग्णालय प्रस्तावित
अनिल कडू
परतवाडा : शहराचाच एक भाग ठरलेल्या अचलपूर तालुक्यातील देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात खासगी कोविड रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे संबंधित डॉक्टरांनी प्रस्ताव सादर केला. जिल्हा प्रशासनाने यास अनुमती दिल्यास अचलपूर तालुक्यातील ते पहिले खासगी कोविड रुग्णालय ठरणार आहे.
शहरातील ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अरविंद भामकर यांनी याकरिता आपले रुग्णालय उपलब्ध करून दिले आहे. डॉ. भामकर आणि डॉ. आशिष भंसाली या दोघांनी मिळून कोविड-१९ हॉस्पिटल सुरु करण्यात परवानगी मिळावी, याकरिता जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. डॉ. हेमंत चिमोटे या प्रस्तावित कोविड रुग्णालयात सेवा देणार आहेत. या प्रस्तावित खासगी कोविड-१९ रुग्णालयात ११ खाटांच्या अतिदक्षता विभागासह ३० खाटांचा आयसोलेशन वार्ड, पाच व्हेंटिलेटर, १९ मॉनिटर, फार्मसी आणि रोगनिदान शास्त्र विभाग सज्ज करण्यात आला आहे. अतिदक्षता विभागातील ११ ही खाटांना सेंट्रलाईज ऑक्सिजन सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. तीन आरएमओंसह आवश्यक नर्स स्टाफ, सर्व्हंट, स्वीपर आणि सुरक्षा रक्षकही या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकाने देवमाळीत येऊन प्रस्तावित रुग्णालयाची व तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांनीही या खासगी कोविड रुग्णालयाची पाहणी केली आहे.
---------------------