कारागृहात लोकसहभागातून कैद्यांना मिळाला दिलासा

By Admin | Updated: September 3, 2016 00:03 IST2016-09-03T00:03:43+5:302016-09-03T00:03:43+5:30

न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना किरकोळ कारणांमुळे शिक्षेतून मुक्ती मिळत नाही.

The prisoners got relief from the public in jail | कारागृहात लोकसहभागातून कैद्यांना मिळाला दिलासा

कारागृहात लोकसहभागातून कैद्यांना मिळाला दिलासा

अनिल बोंडेचा पुढाकार : अभिवचन, संचित रजा व सुटका
अमरावती : न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना किरकोळ कारणांमुळे शिक्षेतून मुक्ती मिळत नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त जीवन जगतात. मात्र आता लोकसहभागातून कैद्यांना दिलासा देण्यासाठी कारागृह प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने शुक्रवारी अभिवचन, संचित व शिक्षा पूर्ण झालेल्या तीन कैद्यांना दिलासा मिळाला आहे.
संत गाडगेबाबा प्रार्थना सभागृहात आयोजित कार्यक्रमाला आ. अनिल बोंडे, वसुधा बोंडे, रोटरी क्लब मेनचे अध्यक्ष अशोक आसोरीया, राम ठोंबरे, के. एम. अंबाडेकर, संजय छांगाणी, बालकिशन पांडे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुंगाधिकारी अशोक जाधव, तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर, शरद माळशिखरे, अवेर संस्थेचे अमित सहारकर, वऱ्हाड संस्थेचे धनानंद नागदिवे, प्रमोद मेश्राम, वैद्यकीय अधिकारी संजय गणोरकर, भूषण कांबळे, आर. के. कानडे आदी उपस्थित होते. यावेळी आ.अनिल बोंडे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी कैद्यांशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न, व्यथा जाणून घेतल्यात. यात कैद्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षेचा कालावधी पूर्ण केला असताना केवळ दंडाची रक्कम भरली नसल्याने ते कारागृहातून बाहेर जाऊ शकत नाही, या व्यथा मांडल्या. अभिवचन, संचित रजेसाठी पोलीस अहवाल सतत ‘निगेटिव्ह’ येत असल्याने अनेकांना कारागृहातच रहावे लागते. कैदीदेखील अखेर माणूसच आहे. त्याच्या हातून कळत, नकळत चुका झाल्यात. मात्र त्याला मानवाधिकारानुसार जगू द्या, चुका सुधारण्याची संधी देण्याची मागणी बहुतांश कैद्यांनी केली. दरम्यान रोटरी क्लबच्या पुढाकाराने तीन कैद्यांना दिलासा मिळाला. अटी, शर्थीच्या अधीन राहून तीन कैद्यांची दंडात्मक रक्कम भरण्यात आली. यात राजीव धुर्वे याची कायम सुटका करण्यात आली आहे. धुर्वे याची शिक्षा पूर्ण होऊनही त्याच्याकडे अडीच हजार रुपये दंड भरण्याची सोय नसल्यामुळे बाहेर जाऊ शकत नव्हते. मात्र शुक्रवारी अ‍ॅड. अशोक गायकवाड यांनी अडीच हजार रुपये भरुन धुर्वे यांची सुटका करुन माणुसकीचा परिचय दिला. जन्मठेपेचा आरोपी त्र्यंबक भागाजी गायकवाड (७८) याची संचित रजा आणि रवींद्र गणेश बांगर याला अभिवचन रजा मंजूर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

अर्धांगवायू कैद्याच्या सुटीसाठी धडपड
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले त्र्यंबक भागाजी गायकवाड (७८, रा. देवळे हातगाव पो. धनसांवगी, जि. जालना) हे येथील मध्यवर्ती कारागृहात १४ डिंसेबर २०१३ रोजी दाखल झाले. मात्र चार महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूने ग्रासले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाला. त्यानंतर कारागृहाच्या दवाखान्यात उपचार सुरुच आहे. वयोवृद्ध त्र्यंबकरावांची प्रकृती बघून त्यांना संचित रजा मिळावी, यासाठी कारागृह प्रशासनाने धडपड केली. आ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला. अटी, शर्थीनुसार त्यांना शुक्रवारी घरी पाठविण्यात आले आहे. ते महिनाभरानंतर कारागृहात परतणार आहेत. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी मोलाची कामगिरी केली.

Web Title: The prisoners got relief from the public in jail