मतदानापूर्वीच भाजपच्या रीता पडोळे अविरोध खाते उघडले : बोंडेंची माघार
By Admin | Updated: February 8, 2017 00:11 IST2017-02-08T00:11:04+5:302017-02-08T00:11:04+5:30
निवडणूक रिंगणातील अन्य एका महिला उमेदवाराने माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्या आहेत.

मतदानापूर्वीच भाजपच्या रीता पडोळे अविरोध खाते उघडले : बोंडेंची माघार
अमरावती : निवडणूक रिंगणातील अन्य एका महिला उमेदवाराने माघार घेतल्याने प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्या आहेत. महापालिकेच्या २४ वर्षांच्या इतिहासात प्रत्यक्ष मतदानापूर्वी नगरसेवक बनणाऱ्या रीता पडोळे या एकमेव ठरल्यात. त्याप्रभाग क्रमांक ७ ‘ब’ ओबीसी महिलेसाठी राखीव जागेचे प्रतिनिधित्व करतील.
४ फेब्रुवारीला झालेल्या नामांकन अर्जांच्या छाननीवेळीच पडोळे यांच्या अविरोध निवडीचे संकेत मिळाले होते. पडोळे यांच्याव्यतिरिक्त याजागेसाठी नामांकन दाखल करणाऱ्या सुलभा बोंडे यांनी मंगळवारी उमेदवारी परत घेतली आणि पडोळे यांचा अविरोध नगरसेविका बनण्याचा मार्ग प्रशस्त झाला. जवाहर स्टेडियम या सातव्या क्रमांकाच्या ‘ब’ जागेसाठी पडोळे आणि बोंडे या दोघींनीच नामांकन दाखल केले होते. विशेष म्हणजे बोंडे यांनी सुद्धा भाजपचे उमेदवार म्हणूनच अर्ज दाखल केला होता.
मात्र, ‘बी-फॉर्म’ पडोळे यांना देण्यात आला. मंगळवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बोंडे यांनी पक्षहित लक्षात घेत नामांकन परत घेतले. माजी महापौर मिलिंद चिमोटे, कोमल बोथरा आणि भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदींनी मतदानापूर्वीच अविरोध निवडून आलेल्या रीता पडोळे यांचे अभिनंदन केले आहे. पडोळे यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाने महापालिकेत प्रत्यक्ष मतदानापूर्वीच विजयाचे खाते उघडले आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)