आधी संघर्ष उमेदवारीसाठी !
By Admin | Updated: November 1, 2016 00:17 IST2016-11-01T00:17:06+5:302016-11-01T00:17:06+5:30
महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे.

आधी संघर्ष उमेदवारीसाठी !
महापालिका निवडणूक : इच्छुकांचा हिरमोड
अमरावती : महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातच विद्यमान नगरसेवकांसह प्रस्थापितांना इच्छुकांच्या भाऊगर्दीचा सामना करावा लागत आहे. इच्छुकांनी विद्यमान व प्रस्थापितांशी निवडून येण्यापूर्वी उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
नवीन प्रभागरचनेनुसार अमरावती महापालिकेत एसआरपीएफ हा एकमेव प्रभाग वगळता सर्व प्रभाग चार सदस्यीय आहेत. यातील आरक्षण घोषित झाल्यामुळे कॉँग्रेसविरुद्ध कॉँग्रेस आणि शिवसेनाविरुद्ध भाजप असा सामना उमेदवाारी मिळविण्याकरिता पहायला मिळणार आहे. विद्यमान सभागृहात काँग्रेसचे २५ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांचे नेतृत्व मान्य करणारे विद्यमान नगरसेवकांसह बरेच इच्छूक काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. राजापेठ प्रभागाचे उदाहरण घेतल्यास येथे राकाँफ्रंटचे गट नेते चेतन पवार आणि कॉँग्रेसचे राजू महल्ले हे दोघे ही विद्यमान नगसेवक कॉँग्रेस उमेदवारीचे दावेदार आहेत. अशा बहुतांश ठिकाणी हा टाय येणार असून उमेदवारी जाहीर करताना कॉँग्रेस नेतृत्वाचा कस लागणार आहे. रा.काँ. फ्रंटचे (खोडके गट) विद्यमान ११ नगरसेवक, बहुतांश इच्छूक व काही अपक्षही काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे ८७ जागांचे वाटप आणि त्यातही अनेक विद्यमान नगरसेवक उमेदवारीसाठी परस्परांसमोर असताना प्राधान्य कुणाला द्यायचे, असा पेच स्थानिक नेतृत्वाला पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्याने या दोन्ही पक्षातील स्थानिकांचे महत्त्व वाढले आहे. काँग्रेस-राकाँ फ्रंटप्रमाणे भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांमध्येही प्रथम उमेदवारी मिळविण्यासाठीच राजकीय लढाई होणार आहे. राजापेठ प्रभागाचे प्रतिनिधित्व घेतल्यास येथे विद्यमान नगरसेवक प्रशांत वानखडे जसे दावेदार आहेत, तसेच त्याच जागेवरून भाजपाकडून अनिल आसलकर दावेदार असल्याने युतीसमोर राजकीय पेच निर्माण झाल्याची परिस्थिती तूर्तास दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
यांच्यासमोर असणार पेच
कॉँग्रेसचे उमेदवार ठरविण्यात संजय खोडके यांच्या सह माजी आ. रावसाहेब शेखावत, महत्त्वपूर्ण भूमिका बनावतील. शहर काँँग्रेसलाही चाचपणी करून उमेदवारी निवडायची आहे. शिवसेनेचे नेतृत्त्व खा. अडसूळ, माजी आ. संजय बंड, प्रशांत वानखडे यांच्याकडे राहील. महानगर प्रमुख सुनील खराटे यांनी उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियाला वेग दिला आहे. भाजपचे नेतृत्व दस्तुर खुद्द पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांच्याकडे असेल. शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांनी शतप्रतिशत भाजपसाठी तयारी चालवली आहे. हे तीन पक्ष वगळता राष्ट्रवादीत सामसूम आहे. नव्याने शहराध्यक्ष झालेले बाबा राठोड, सुनील वऱ्हाडेंच्या सहकार्याने उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे देवू शकतात.
पक्ष एक, इच्छुक अनेक
जुन्या दोन किंवा तीन प्रभागांचा एकच प्रभाग झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. २२ पैकी २१ प्रभागांमध्ये जोग स्टेडियममधील ‘क’ जागा वगळता अन्य ‘क’ अािण ‘ड’ असा ४२ जागा खुला प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या ‘क’ आणि ‘ड’ जागांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी एकवटणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे. प्रत्येक पक्षातील उमेदवारांची पहिली लढाई आपल्याच पक्षातील इच्छुकांशी होणार आहे.
शुभेच्छांच्या पायघड्या
चौका-चौकात आणि प्रभागात सर्वदूर दिवाळी शुभेच्छांच्या पायघड्या घेलण्यात आल्या आहेत. अर्थात आपर निवडणूक रिंगणात आहोत, याची वर्दी त्या इच्छुकांनी मतदारांना आगाऊ दिली आहे. अनेक माजी नगरसेवक पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर फलकावर दिसू लागले अहेत. एकंदरीतच दिवाळीनंतर महापालिका निवडणुकीचा जोर तापण्यास सुरुवात झाली आहे.