पंतप्रधान मुद्रा योजना बारगळली!
By Admin | Updated: October 11, 2015 01:43 IST2015-10-11T01:43:09+5:302015-10-11T01:43:09+5:30
छोट्या उद्योजकांसाठी सुरू केलेली पंतप्रधान मुद्रा योजना पहिल्या टप्प्यातच बारगळली आहे.

पंतप्रधान मुद्रा योजना बारगळली!
बँकांचे असहकार्य : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
अमरावती : छोट्या उद्योजकांसाठी सुरू केलेली पंतप्रधान मुद्रा योजना पहिल्या टप्प्यातच बारगळली आहे. बँकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने अनेक बेरोजगारांनी या चांगल्या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये या योजनेचे अर्जच उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी कागदपत्रांसाठी अडवणूक केली जात असल्याची ओरड आहे.
५० हजार ते १० लाख अशा तीन टप्प्यांत ही कर्ज योजना आहे. शिशू, मध्यम व मोठे असे वर्गीकरण यात आहे. मात्र विशिष्ट बँकेत विशिष्ट परिसरातील व्यक्तींनाच कर्ज दिले जाईल, अशी अटही बँकांनी घातल्याने नागरिकांना इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सर्व बँक प्रमुखांची बैठक घेऊन योग्य ते दिशानिर्देश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)