प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना लगावली थापड
By Admin | Updated: April 29, 2016 00:17 IST2016-04-29T00:17:40+5:302016-04-29T00:17:40+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांना एका महिलेने थापड लगावल्याची घटना...

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना लगावली थापड
झेडपीतील प्रकार : अध्यक्षांसमोर रंगले नाट्य
अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांना एका महिलेने थापड लगावल्याची घटना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ‘अॅन्टीचेंबर’मध्ये गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली होती.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चिखलदरा पंचायत समितीमध्ये कार्यरत सहायक शिक्षक मदन शेळके यांना सन १९९६ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र, त्यांनी सेवाकाळातील सर्व थकबाकी देऊन सेवेत पुन्हा सामावून घ्यावे, यासाठी २५ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.गुरूवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. उपोषणकर्त्यांची बाजू मांडण्यासाठी गुरूवारी शेळके यांचे काही सहकारी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांचेकडे आले े. त्यांनी अध्यक्षांना यावर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार अध्यक्षांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांना शेळके यांचे प्रकरण समजावून घेण्याकरिता त्यांच्या दालनात बोलविले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी एस.एम.पानझाडे जि.प.अध्यक्षांच्या दालनात पोहोचले. यावेळी उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी दालनात हजर होते. यामध्ये काही दोन महिलांचा देखील समावेश होता. शिष्टमंडळातील एका व्यक्तीसोबत जि.प.अध्यक्ष सतीश उइके, जिल्हा परिषद सदस्य मोहन सिंगवी, शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे हे अॅन्टीचेंबरमध्ये बंदव्दार चर्चेमधून उपोषणकर्त्याच्या मागण्यांवर लेखी उत्तर देण्यासाठी तयार केलेल्या पत्रावर मसलत करीत होते.
शासकीय कागदपत्रेही फाडली
अमरावती : यावेळी शिष्टमंडळातील दोन महिला व काही पुरूष अध्यक्षांच्या दालनात बसून होते. याशिवाय जि.प. सदस्य उमेश केने, मोहन पाटील हे सुध्दा दालनात उपस्थित होते. यातील एका महिलेने दालनातून उठून अध्यक्षांच्या अॅन्टीचेंबरचे दार ठोठावले. त्यामुळे चर्चेत व्यस्त जिल्हा परिषद सदस्यांनी दार उघडले. दार उघडताच ही महिला चेंबरमध्ये शिरली आणि शिक्षणाधिकारी पानझाडे यांना दोन थापडा लगावल्या. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेत धडकले. या प्रकरणाची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. आणि मारहाण करणाऱ्या महिलेने शिक्षणाधिकारी यांच्याकडील शासकीय कागदपत्रे सुध्दा फाडली. ही कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी रवाना झाले होते.