रेतीच्या किमतीत आठपटीने वाढ
By Admin | Updated: February 13, 2015 00:49 IST2015-02-13T00:49:30+5:302015-02-13T00:49:30+5:30
दिवसेंदिवस पडणारा अल्प पाऊस अशातच जिल्ह्यात प्रकल्पाची संख्या वाढल्यानंतर नदीला येणारे पूर बंद झाल्याने रेतीच्या लिलावाची किंमत तीन वर्षांत ...

रेतीच्या किमतीत आठपटीने वाढ
मोहन राऊत अमरावती
दिवसेंदिवस पडणारा अल्प पाऊस अशातच जिल्ह्यात प्रकल्पाची संख्या वाढल्यानंतर नदीला येणारे पूर बंद झाल्याने रेतीच्या लिलावाची किंमत तीन वर्षांत आठपटीने वाढली आहे़ ५३ वरून ८१ घाट तयार झाले आहेत़ याची किंमत चार कोटीहून ३१ कोटीपर्यंत पोहचली आहे़
सर्वाधिक महसूल देणारा जिल्ह्यात रेती व्यवसाय आहेत़ सन २०१२-१३ मध्ये महसूल विभागाने ५३ घाट लिलावासाठी काढले होते़ ८९ हजार ७४९ ब्रास च्या रेतीची निर्धारित रक्कम ४ कोटी ७६ लाख ४२ हजार ८८९ रूपये ठेवली होती़ सन २०१३-१४ मध्ये ११४ घाटांचा लिलाव महसूल विभागाने केला. १ लाख ७७ हजार ४४५ ब्रास रेतीची निर्धारित रक्कम १५ कोटी ७१ लाख १५ हजार अशी होती़ सन २०१४-१५ या चालू वर्षांत ८१ रेती घाटांच्या लिलावाची निर्धारित रक्कम तब्बल ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार ५६५ रूपये ठेवून १ लाख ९ हजार ५५३ ब्रास रेतीचा लिलाव काढला. यातून सर्वाधिक २१ कोटी रूपयांच्या सात घाटांचे लिलाव वाढत्या रक्कमेमुळे झाले नाहीत़
भूजल सर्वेक्षण विभागाने केला प्रताप
वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यातील नायगाव, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, विटाळा, दिघी महल्ले ही घाट येतात महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी यांनी या घाटांच्या लांबी-रूंदी चौरस मीटर मोजण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर महसूल विभागाने या घाटांतील रेतीच्या ब्रासचे मोजमाप करण्याचे आदेश भुजल सर्वेक्षण विभागाला दिले होते. या विभागाने तालुक्यातील पाच घाटांतील रेतीची खोली मोजून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. एकीकडे या तालुक्यात बगाजी सागर धरण असल्यामुळे वर्धा नदीला पाहिजे त्या प्रमाणात पूर येणे बंद झाले आहे़ तसेच गतवेळी पावसाचे अल्प प्रमाण असल्यामुळे रेतीचा साठा नसतांना दुसरीकडे भूजल सर्वेक्षण विभागाने मागील दोन वर्षे अर्धा मीटर खोल असलेली रेती तब्बल यंदा दीड मीटरपर्यंत उत्खनन करता येत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे रेतीची किंमत अधिक वाढली आहे़
बांधकामवरील मजुरांवर उपासमारीची पाळी
जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात धामणगाव तालुका अग्रेसर आहे़ येथील रेती उत्खनन व बांधकामावर मजुरी करणारे अनेक कुटुंब आहेत़ मागील दोन महिन्यापासून रेतीचा लिलाव न झाल्यामुळे बांधकाम पूर्णत: ठप्प आहेत़ या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे़ विकासात्मक कामे या रेतीमुळे बंद असल्याचा थेट अहवाल बांधकाम विभागाने शासनाला पाठविला आहे़
धामणगाव तालुक्यात रेतीला सोन्याचे भाव
जिल्ह्यात सर्वाधिक धामणगाव तालुक्याने महसूल विभागाला रेतीमधून महसूल दिला आहे़ पहिल्या वर्षात जिल्ह्याच्या ४ कोटी ७६ लाख ४२ हजार पैकी १ कोटी १८ लाख ५१ हजार अशा १० हजार ७२४ ब्रास ची रक्कम केवळ धामणगाव तालुक्याची होती़ तर दुसऱ्या वर्षात जिल्ह्यासाठी असलेल्या निर्धारीत १५ कोटी ७१ लाख रक्कमे पैकी १ कोटी ८८ लाख ९० हजार रूपयांची पाच घाटाची निर्धारीत रक्कम होती़ तसेच या वर्षात ही रक्कम तब्बल दहा पटीने वाढली आहे़ यंदा सात घाटातील ४९ हजार ५२३ ब्रास रेतीची किंमत २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ८७४ रूपये ठेवण्यात आली आहे़ या वाढत्या दरामुळे रेती घाटाचा लिलाव घेण्यास कोणीही अद्यापही पुढे आले नाही़