आधी घेतले विष, मग कापली धमणी, तरीही जिवंतच
By Admin | Updated: August 10, 2014 22:44 IST2014-08-10T22:44:59+5:302014-08-10T22:44:59+5:30
जीवनभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर मुलीच्या कुटुंबाकडून प्रेमाला विरोध झाला. त्यामुळे प्रेमीयुगुलाने शेतात जाऊन सोबतच विष प्राशन केले. परंतु त्यातूनही मरण येत

आधी घेतले विष, मग कापली धमणी, तरीही जिवंतच
बेलोरा : जीवनभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर मुलीच्या कुटुंबाकडून प्रेमाला विरोध झाला. त्यामुळे प्रेमीयुगुलाने शेतात जाऊन सोबतच विष प्राशन केले. परंतु त्यातूनही मरण येत नसल्याचे पाहून दोघांनीही हाताच्या धमण्या कापल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राला फोन करुन त्याच्याजवळ हकिकत कथन केली. या मित्राने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना चांदूरबाजार तालुक्यात देऊरवाडा येथे घडली.
देऊरवाडा येथील उदय अरुणराव वडनेरकर (२६) व रिया (२०, बदललेले नाव) यांचे अनेक दिवसांपासून प्रेम जडलेले. दोघांनी सोबत राहण्याच्या आणा-भाका घेतल्या. परंतु मुलीच्या घरुन या प्रेमविवाहाला विरोध झाला. त्यामुळे ८ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजता मुलगी घराबाहेर पडली. तिने प्रियकर उदयलाही बोलावून घेतले. दोघेही देऊरवाडा येथील एका शेतात गेले. उदयने सोबत विषाची बाटली आणलेली होती. दोघांनीही जीवन संपविण्याचा निर्णय घेऊन विष प्राशन केले. परंतु यातून मरण येत नसल्याचे पाहून दोघांनीही ब्लेडने हाताच्या धमण्या कापल्या. परंतु त्यानंतरही मरण त्यांना शिवत नव्हते. आपल्याला मरण येत नसल्याचे पाहून उदयने ९ आॅगस्ट रोजी सकाळी आपल्या चुलत भावाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि संपूर्ण हकिकत त्याच्याकडे कथन केली. त्याने घटनास्थळ गाठून या प्रेमीयुगुलाला ग्रामीण रुग्णालय व तेथून अमरावतीला नेले. उपचारानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.