मुस्लिम सदस्यांचे दबावतंत्र
By Admin | Updated: September 3, 2014 22:59 IST2014-09-03T22:59:41+5:302014-09-03T22:59:41+5:30
येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे.

मुस्लिम सदस्यांचे दबावतंत्र
महापौरपदाची निवडणूक : शेख जफर यांना उपमहापौरपदाची दुसऱ्यांदा संधी
अमरावती : येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. महापालिकेतील सर्वपक्षीय मुस्लिम सदस्यांनी दबावतंत्र निर्माण करुन शेख जफर शेख जब्बार यांच्या नावावर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून शिक्कामोर्तब करुन घेतले. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीचे चित्र पालटणार आहे.
महापालिकेत ८७ सदस्य संख्या असून महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ४४ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यानुसार काँग्रेसकडे ३० तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटकडे २३ सदस्य आहेत. आघाडीत एकूण ५३ सदस्य असून या संख्याबळाच्या आधारावर ही निवडणूक अविरोध होऊ शकते. मात्र राष्ट्रवादी काँगेस फ्रंटमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाचेही परिणाम महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. गटनेता अविनाश मार्डीकर की, सुनील काळे यावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने दाखलप्रकरणी ५ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रवादीच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांना कायम ठेवण्याचा निकाल यापूर्वीच दिला. निकालाला आव्हान व राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेसवर कुरघोडी
महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत संजय खोडके गटाला बाजूला ठेवून काँग्रेसने राष्ट्रवादीच्या सदस्यांना सोबत घेत सत्तेची समीकरणे जुळवून आणावीत, याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसचे नेते आ. रावसाहेब शेखावत यांच्यावर दबाव आणू शकतात, अशी चर्चा महापालिका वर्तुळात जोर धरु लागली आहे. आघाडी धर्मानुसार खोडके नव्हे, तर राष्ट्रवादीशी मैत्री करुन महापालिकेत सत्ता स्थापन व्हावी, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काँग्रेसवर दबाव आल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.