‘कृष्णा’ला मिळावा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार
By Admin | Updated: April 11, 2015 00:15 IST2015-04-11T00:15:39+5:302015-04-11T00:15:39+5:30
मंगळवारी सकाळी ११.३० वाजता तालुक्यातील माखला येथे जळालेल्या सात घरांतील आदिवासींना तहसीलदार आर.यू. सुराडकर यांनी सानुग्रह अनुदान वाटप केले..

‘कृष्णा’ला मिळावा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार
प्रस्ताव पाठविणार : माखला येथील जळत्या घरातून वाचविले चिमुकल्याचे प्राण
नरेंद्र जावरे चिखलदरा
मंगळवारी सकाळी ११.३० वाजता तालुक्यातील माखला येथे जळालेल्या सात घरांतील आदिवासींना तहसीलदार आर.यू. सुराडकर यांनी सानुग्रह अनुदान वाटप केले. पेटत्या घरात उडी घेऊन पाळण्यातील अनिकेतला अडीच महिन्यांच्या चिमुकल्याचे प्राण वाचविणाऱ्या इयत्ता सहावीत शिकत असलेल्या कृष्णा रज्जू बेठेकरचे शौर्य प्रशंसनीय असून त्याला ‘राष्ट्रपती शौर्य पुरस्कार’ मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने त्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
मंगळवारी माखला येथे चुलीतील निखारा हवेमुळे कुळाच्या झोपडीतील लाकडाला लागला व त्यात सात घरांची राखरांगोळी झाली. बुधवारी चिखलदऱ्याचे तहसीलदार आर. यू. सुराडकर यांनी माखला येथे जाऊन सानुग्रह अनुदान कपड्यांसाठी १३०० रूपये व भांडे आदी साहित्यासाठी १४०० रूपये असे २ हजार ७०० रूपये प्रत्येक कुटुंबप्रमुखाला देण्यात आले.
रामजी मावस्कर, मुंगीलाल म्हातींग मावस्कर, रामकिसन मुंगीलाल मावस्कर, परशराम मुंगीलाल मावस्कर, काशीराम मावस्कर, श्यामलाल धिकार, शितू धिकार आदींना त्यांनी वाटप केले. या आगीत आणखी घरे भस्मसात होण्याची शक्यता वाढत असताना नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून पुढील होणारी हानी टाळण्यात यश मिळविले. त्यामुळे अधिक नुकसान टाळता आले. कृष्णाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ती म्हणाली, ‘मेरे भाई को बचा ना रे’
माखला येथील सात घरांना आग लागून त्याची राखरांगोळी होत होती. सकाळी ११.४० वाजताची ही घटना. गावातील शाळा सकाळची असल्याने ११.३० ला सुटी झाली. कृष्णा रज्जू बेठेकर हासुद्धा शाळेतून घरी जात होता. आपल्या घराची राखरांगोळी डोळ्यादेखत पहिल्या वर्गातील नीलम ऊर्फ पूजा परसराम बेठेकर पाहत होती. त्या जळत्या घरात तिचा अडीच महिन्यांचा भाऊ अनिकेत पाळण्यात झोपला होता. शाळेतून घरी जाणाऱ्या कृष्णाला टेंब्रुढाण्यातील घरे पेटताना दिसल्याने तोसुद्धा थांबला. आपल्या व जळत्या घरापुढे भावाला पाळण्यात पाहत उभी असलेल्या पूजाने कृष्णाला आवाज दिला. ‘मेरा भाई अंदर है, मेरे भाई को बचा ना रे’ तिचे हे शब्द ऐकताच कृष्णाने सरळ त्या पेटत्या घरात प्रवेश केला व चिमुकल्या अनिकेतला बाहेर काढल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कृष्णाचा प्रस्ताव शौर्यपदासाठी
माखला येथील घरे पेटत असताना जीवाची तमा न बाळगता घरात शिरून पाळण्यातील अनिकेत या अडीच महिन्याच्या बालकास वाचविणाऱ्या कृष्णा रज्जू बेठेकर याच्या या शौर्याची दखल तहसीलदार आर. यू. सुराडकर, पं. स. चे खंडविकास अधिकारी एन. टी. देसले यांनी घेऊन त्याची पाठ थोपटली व रोख बक्षीस दिले. याचे प्रथम वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याच्या शौर्याची दखल घेत ‘राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी’ प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शिक्षिका वंदना धवणे यांनीही आपल्या विद्यार्थ्याचे कौतुक करीत वरिष्ठांना प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली आहे. पटवाऱ्यामार्फत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याचे तहसीलदार सुराडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निराधार कृष्णा करतो भावंडांसह शेतात मजुरी
पेटत्या घरात उडी घेऊन चिमुकल्या अनिकेतचे प्राण वाचविणारा कृष्णा बेठेकरला तिघे भावंडं असून कृष्णा सहाव्या वर्गात, मोठी बहीण ज्योती आठवी व नागेश चौथ्या वर्गात माखला येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतात. आईने दुसरे लग्न केले तर वडील अपंग आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने कृष्णा, बहीण ज्योती व नागेश तिघेही गावातील शेतात मजुरीचे काम करतात. शाळा करून पोटासाठी त्यांना मजुरी करावी लागत असल्याने शासनातर्फे योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा त्याची वर्गशिक्षिका वंदना धवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कृष्णाचे शौर्य पाहता राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव बनवून वरिष्ठ स्तरावरून पाठविण्यात येईल. प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले असून आगग्रस्तांना सानुग्रह अनुदानाचे वाटपसुद्धा करण्यात आले आहे.
- आर. यू. सुराडकर,
तहसीलदार, चिखलदरा.
कृष्णा निराधार असून तो शाळा शिकतोय. सुटीच्या दिवशी तो शेतात मजुरीचे काम करून आपला खर्च भागवितो. त्याला मदत मिळावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे.
- वंदना धवणे,
शिक्षिका, जिल्हा परिषद
माध्यमिक शाळा, माखला.