अध्यक्षांनी हुडकून काढले गैरहजर अधिकारी
By Admin | Updated: November 10, 2014 22:36 IST2014-11-10T22:36:34+5:302014-11-10T22:36:34+5:30
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सतीश उईके यांनी सूत्रे स्वीकारताच सोमवार १० नोव्हेंबर रोजी आपल्या कामांचा धडाका सुरू करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास काही विभागांना आकस्मिक भेट

अध्यक्षांनी हुडकून काढले गैरहजर अधिकारी
अमरावती : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सतीश उईके यांनी सूत्रे स्वीकारताच सोमवार १० नोव्हेंबर रोजी आपल्या कामांचा धडाका सुरू करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास काही विभागांना आकस्मिक भेट देऊन जिल्हा परिषदेतील हजर व गैरहजर अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष त्यांच्या दालनात पोहोचून शोधमोहीम राबविली.
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध विभागांचे खातेप्रमुख आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवार या दिवशीही मुख्यालयात हजर राहत नसल्याने बाहेर ठिकाणाहून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रित्या हातानेच परतावे लागते. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके यांनी दुपारी ४ वाजता प्रथम जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी एन. एन. भालेराव यांचे दालन गाठून आकस्मिक भेट दिली असता या ठिकाणी या विभागाचा जबाबदार अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. दरम्यान अध्यक्षांनी याठिकाणी उपस्थित असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांची पेशी घेऊन त्यांच्याकडून अधिकाऱ्याच्या दौऱ्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी दौऱ्याबाबतचे नियोजन पुस्तिका मागून त्यांनी शेरा नोंदविला. त्यानंतर अध्यक्षांनी भूजल सर्वेक्षण विभागाचे कार्यालय गाठले. या ठिकाणी खातेप्रमुख गैरहजर असल्याचे आढळून आले. केवळ चार कर्मचारी उपस्थित होते.
गैरहजर राहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला खुलासा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अध्यक्षांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. भागवत यांचे दालन गाठले. मात्र याठिकाणी भागवत हजर असल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक बोलावून हजर व गैरहजर कर्मचाऱ्यांची पडताळणी केली. पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्षांनी विविध विभागांच्या खाते प्रमुखांनी सोमवार व शुक्रवार या दोन दिवस आपल्या मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले होते.