इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीतच झाला त्यांच्या उमेदवारीला विरोध
By Admin | Updated: July 14, 2014 00:50 IST2014-07-14T00:50:54+5:302014-07-14T00:50:54+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर

इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीतच झाला त्यांच्या उमेदवारीला विरोध
बाहेरचा लादलेला उमेदवार नकोच : भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर
सुरेश सवळे चांदूरबाजार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बाहेरचा व लादलेला उमेदवार विधानसभा निवडणुकीत नको, असा सूर या बैठकीचा होता. या बैठकीत अचलपूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांचे नाव न घेता काही वर्षांपूर्वी भाजपात पदार्पण केलेल्या व बाहेरचा लादलेला उमेदवार मतदारसंघात सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडून तसा ठरावच प्रदेशाध्यक्षांकडे पाठविल्यामुळे ही बैठक अख्या मतदारसंघात चांगलीच चर्चिली जात आहे.
शुक्रवारी अचलपूर मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक स्थानिक आनंद सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे हे होते. मनोहर सुने, प्रमोद कोरडे, अशोक बनसोड, रूपेश ढेपे, गजानन कोल्हे, चक्रधर घुलक्षे, रवी पवार यांच्यासह अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक आघाडी व तालुक्यातील सर्व बुथ प्रमुख उपस्थित होते.
सुरुवातीला या बैठकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व डॉ. आंबेडकर पुरस्कार प्राप्त बापूसाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेत मतदारसंघातील उमेदवारीचा मुद्दा चांगलाच गाजला. या बैठकीत वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच अचलपूर मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ असताना मागील विधानसभा निवडणुकीत हा शिवसेनेला देण्यात आला. मात्र त्यावेळी सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा, असा ठराव संमत करण्यात आला.
यानंतर झालेल्या चर्चेत गजानन कोल्हे यांनी उमेदवारीचा प्रश्न उचलून धरला. पक्षाला ‘अच्छे दिन’ आल्याचा उल्लेख करून पक्षात इतर पक्षातून आलेल्यांची रांग लागली आहे. त्यामुळे जुन्या व पक्षात एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गोची होणार आहे. या आधीही काही नेते पक्षात आले आणि ते आता उमेदवारीची मागणी करीत आहेत. आताही अनेक जण पक्षाच्या दारात उभे आहेत. अशीच अवस्था राहिली व त्यांना उमेदवारी मिळाली तर सुसंस्कृत पक्षाला काँग्रेसचे स्वरूप येईल, अशी भूमिका स्पष्ट करून मतदारसंघाच्या बाहेरचा व लादलेला उमेदवार मतदारसंघातील कार्यकर्ते कदापिही सहन करणार नाही, असा इशाराच दिला. सदर ठराव संमत करून प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आला आहे. सभाध्यक्ष भारसाकळे यांनी लोकसभेतील यशाचे श्रेय मोदींना देऊन मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी किती प्रमाणात काम केले हे तपासून पाहण्याची आवश्यकता व्यक्त करून अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. याबाबत कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याने ही बैठक वादळी ठरली.