जिल्ह्यात ४११ गावांचा स्वच्छता आराखडा तयार
By Admin | Updated: June 20, 2016 00:02 IST2016-06-20T00:02:30+5:302016-06-20T00:02:30+5:30
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ४११ गावांचा स्वच्छता आराखडा तयार
उपक्रम : जिल्हा परिषदेच्या पाणी, स्वच्छता मिशनचा पुढाकार
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याच्या माध्यमातून संबंधित गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार आतापर्यंत ५० गावांचा कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून स्वच्छतेच्या कामांना गती दिली जात आहे.
ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चवदाही तालुक्यांतील ४११ गावांमध्ये स्वच्छतेसह हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यात निवडण्यात आलेल्या गावांत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि संबंधित पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रबोधन सुरू केले आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच गावांचा आराखडा तयार करण्यात येऊन ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी प्रेरित केले जाणार आहे. यासाठी संबंधित गावांचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिकांची मदत घेतली जात आहे. गावातील भौगोलिक स्थितीचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येकांवर जबाबदारी
कृती आराखड्यानुसार गावात कोणती कामे करायची, हे निश्चित केले जाते. शिवाय गावाची लोकसंख्या व कुटुंबसंख्या गृहित धरली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाची गती कशी असावी, याची कल्पना येते. शिवाय प्रत्यक्षात स्वच्छतेला कुठून सुरुवात करायची यावर चर्चा होईल. गावातील प्रत्येक घटकावर स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागात या मोहिमेला बळ मिळणार आहे.