सुरक्षारक्षकांच्या मानधनात पक्षपात

By Admin | Updated: December 23, 2016 00:14 IST2016-12-23T00:14:36+5:302016-12-23T00:14:36+5:30

महापालिकेच्या सुरक्षेचा भार वाहणाऱ्या सुरक्षारक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनात पक्षपातीचे धोरण अवलंबत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Prejudice to the protection of the security forces | सुरक्षारक्षकांच्या मानधनात पक्षपात

सुरक्षारक्षकांच्या मानधनात पक्षपात

प्रदीप भाकरे अमरावती
महापालिकेच्या सुरक्षेचा भार वाहणाऱ्या सुरक्षारक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनात पक्षपातीचे धोरण अवलंबत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडून प्रति सुरक्षारक्षक ८,७२६ रुपये मिळत असून सुरक्षारक्षकांना देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये मात्र एकवाक्यता नाही.
दादा-भाऊंच्या कृपाछत्राखाली वावरणाऱ्या सुरक्षारक्षकांना ६ हजार रुपये, कुणाला ५५००, तर ज्यांचा कुणीच मायबाप नाही, अशांना महिन्याकाठी केवळ ५ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळेच या कर्मचाऱ्यांच्या मानधनातून कपात करण्यात येत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मानधनात जर एकवाक्यता नसेल तर पीएफ कपात कसा करण्यात येतो? आणि पीएफची रक्कम कपात करून संबंधित कार्यालयात भरणा केली जात असेल तर त्याच्या पावत्या कुठाय, असा रोकडा सवाल सुरक्षारक्षकांनी उपस्थित केला आहे.
‘अमृत’ सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या नागरिक सहकारी संस्थेकडून महापालिकेला सुरक्षारक्षकासह अन्य कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर घेतल्या जातात. मात्र विविध कराच्या स्वरुपात ४७ ते ४८ टक्के रक्कम कपात करून ‘अमृत’ने या कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक चालविली आहे. महापालिकेकडून प्रतिसुरक्षारक्षक ८७२६ रुपये मिळत असले तरी त्यातून २५.६१ टक्के पीएफ,१५ टक्क़े सेवा कर आणि ईएसआयसीसह ४७ ते ४८ टक्के रक्कम कपात केली जात असल्याचा दावा ‘अमृत’च्या सचिवांकडून केल्या जात असला तरी त्याबाबत हिशेब मात्र दिल्या जात नाही. करांच्या एकूण हिशेबाचा मेळ न जुळविताच जीएडीतील विशिष्ट कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हा गोरखधंदा अव्यवहतपणे सुरू आहे. महापालिकेतील विशिष्ट एका लॉबीला महिन्याकाठी विशिष्ट रक्कम पोहोचविण्यात येत असल्याने या गोरखधंद्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

सुरक्षारक्षकांची एकी
‘असुरक्षित सुरक्षारक्षक ’या मथळ्याखाली 'लोकमत'ने सुरक्षारक्षकांची आर्थिक नाडवणुकीला वाचा फोडल्यानंतर सुरक्षारक्षक एकत्र येऊ लागले आहेत. परस्परांना भेटून आणि आता काय करायचे यावर त्यांच्यात संवाद होऊ लागला आहे. दोन सुरक्षारक्षकांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांसह पीएफ कार्यालयात तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.अमृतच्या अध्यक्ष आणि सचिवांनी मानधानातून कपात केलेल्या रकमेचा हिशेब द्यावा, अशी रास्त अपेक्षा सुरक्षारक्षकांची आहे.

जीएडीमधील ‘तो’ कर्मचारी कोण ?
आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही, या अविर्भावात जीएडीतील एका कर्मचाऱ्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या फाईल्समध्ये अधिकचा ‘इंटरेस्ट’ दाखविणे सुरू केले आहे. या कर्मचाऱ्याची ‘अमृत’ या संस्थेमध्ये भागिदारी असण्याची शक्यताही काही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविल्याने या शक्यतेला अधिकच बळ मिळाले आहे. मासिक मानधन वितरित करतेवेळी या कर्मचाऱ्याच्या उपस्थितीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील अनेक दिवसांपासून एकच कर्मचारी या फाईल्स हाताळतो आहे.

Web Title: Prejudice to the protection of the security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.