प्रविणा डहाके अविरोध !
By Admin | Updated: August 8, 2016 23:58 IST2016-08-08T23:58:10+5:302016-08-08T23:58:10+5:30
शिवसेनेचे नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नवाथे प्रभागाची पोटनिवडणूक अविरोध होण्याचे संकेत आहेत.

प्रविणा डहाके अविरोध !
पोटनिवडणूक : नामांकनाचा आज शेवटचा दिवस
अमरावती : शिवसेनेचे नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नवाथे प्रभागाची पोटनिवडणूक अविरोध होण्याचे संकेत आहेत. ही पोटनिवडणूक २८ आॅगस्टला होणार आहे. त्यासाठी राजकीय बैठकांना वेग आला आहे. ही निवडणूक अविरोध करण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे. या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत १० नामांकनाची उचल झाली आहे. त्यापैकी प्रविणा डहाके यांनीच अर्ज दाखल केला आहे. ९ आॅगस्टपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील.
मार्च २०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे नवाथे प्रभागाची पोटनिवडणूक जिंकणाऱ्यांसाठी नगरसेवक पद औटघटकेचे ठरणार आहे. त्यामुळे दिगंबर डहाके यांच्या पत्नी प्रविणा यांना नगरसेवकपदाची संधी द्यावी, असा सूर शिवसेनेच्या गोटातून उमटत आहे. त्यासाठी अन्य राजकीय पक्षप्रमुखांशी चर्चा सुरू आहे. डहाके यांनी सलग १९ वर्षे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रविणा डहाके यांना अविरोध निवडून आणण्याचा असा जोरकस प्रयत्न आहे. या संदर्भात खा.आनंद अडसूळ यांनी प्रविणा डहाके यांना अविरोध निवडून आणण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये जिंकणाऱ्याला उणेपुरे ५ महिने मिळणार आहेत. या अनुषंगाने राजकिय हालचाली तीव्र झाल्या आहेत. याबाबत काँग्रेस, राकाँ, भाजप आणि अन्य पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घण्यात आली आहेत. बहुतेक सर्व पक्षांनी डहाके यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.