प्रथमेशच्या जीवाला पुन्हा धोका !

By Admin | Updated: August 16, 2016 23:54 IST2016-08-16T23:54:22+5:302016-08-16T23:54:22+5:30

नागपूरच्या खासगी इस्पितळात दाखल असलेल्या प्रथमेशच्या जीवाला उपचारादरम्यान धोका उद्भवू शकतो, ...

Prathamesh's life is threatened again! | प्रथमेशच्या जीवाला पुन्हा धोका !

प्रथमेशच्या जीवाला पुन्हा धोका !

पोलीस बेफिकीर : संशयित लोकांना थेट आयसीयुमध्ये प्रवेश
अमरावती : नागपूरच्या खासगी इस्पितळात दाखल असलेल्या प्रथमेशच्या जीवाला उपचारादरम्यान धोका उद्भवू शकतो, अशी दाट शक्यता 'लोकमत'च्या शोधमोहिमेत समोर आली आहे. नरबळी ठरता-ठरता वाचलेला प्रथमेश हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह््याचा एकमेव जीवंत पुरावा आहे. प्रथमेशच्या जीवावर उठणाऱ्यांची त्याच्यावर असलेली २४ तास नजर आणि पोलिसांची तितकीच बेफिकीरी गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे.
प्रथमेश सगणे हा ११ वर्षीय विद्यार्थी पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमात गळा कापलेल्या स्थितीत आढळला. आश्रमात कार्यरत असलेल्या तिघांनी त्याचा नरबळी देण्यासाठी गळा कापला होता, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. प्रकरणाचा छडा लागला, असे वरकरणी दिसत असले तरी शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात घडलेल्या या गुन्ह््याला अनेक कांगोरे आहेत. प्रथमेशच्या जीविताला आता धोका त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. 'लोकमत'च्या शोधमोहिमेत अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.
नागपुरातील 'लोकमत' चौकात असलेल्या खासगी इस्पितळात दाखल असलेला प्रथमेश मरणाशी झुंजतो आहे. मृत्यूने त्याला पहिल्यांदा नागपंचमीच्या दिवशी पिंपळखुट्यात गाठण्याचा प्रयत्न केला; पण इवलासा प्रथमेश शूर मोठा! त्याने एकट्यानेच मृत्यूला पिटाळले. तो रुग्णालयातही प्रत्येक क्षणाला मृत्यूवर मात करतो आहे. मृत्यूशी सुरू असलेल्या त्याच्या या लढ्यात आता अवघे अमरावतीवासी सोबतीला आहेत. प्रथमेशसाठी घराघरात हृदयाच्या तळातून प्रार्थना सुरू आहेत. हातची कामे सोडून लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. प्रथमेशच्या न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जमणारी निवेदनकर्त्यांची गर्दी बघितली की, प्रथमेशचा लढा आता लोकलढ्यात रुपांतरीत झाल्याचे सिद्ध होते. मारणारा कितीही बलवान असला तरी वाचविणारा त्याहीपेक्षा बलवान असतो. प्रथमेश जिंकणारच हा अवघ्या अंबानगरीचा विश्वास आहे. हा विश्वास अतुट असला तरी प्रथमेशच्या जगण्याने ज्यांच्या गळ्याभोवती फास आवळला जाणार आहे, ती मंडळी त्याच्या नसण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना रोखणे, जेरबंद करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. धैर्य दाखवावे लागणार आहे. पोलिसांना हे फारच अडचणीचे असेल तर किमान प्रथमेशला कडेकोट सुरक्षा प्रदान करणे पोलिसांना विनासायास शक्य आहे. रात्र वैऱ्याची आहे. पोलिसांची प्रामाणिक दक्षता ही प्रथमेशच्या आयुष्याचे गॅरन्टीपत्र ठरणार आहे.

-तर तपासाला मिळू शकेल निर्णायक वळण
अमरावती : प्रथमेश आश्रम परिसरात वास्तव्याला असताना त्याच्यावर खिळलेल्या खुनी नजरांपासून संरक्षण करू न शकणारी महाराजप्रेमी मंडळी आता प्रथमेशसाठी हळवी झाली आहे. प्रथमेशशिवाय त्यांना करमेनासे झाले आहे. सतत प्रथमेशच्या भेटीसाठी त्यांची रीघ असते. ते आलेत की, थेट आयसीयूमध्ये दाखल होतात. मुर्छितावस्थेत असलेल्या चिमुकल्या प्रथमेशच्या बेडजवळ जातात. त्याला न्याहाळतात. प्रथमेशप्रतिची त्यांची ही अगतिकता प्रथमेशला 'नजर' लावणारी आहे.
येणारे कोण? त्यांचा परिचय काय? त्यांना कुणी धाडले? त्यांचा उद्देश काय? त्यांचे पते काय? संसथेतील पद काय? प्रथमेश कायम निद्रावस्थेत असताना त्याला भेटण्याची उत्सुकता कशाची? प्रथमेशच्या जागण्याची? की जागल्यानंतर तो निजण्याची?, या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक झाले आहे.
प्रथमेशच्या सुरक्षेसाठी एक पीएसआय आणि एक शिपाई इस्पितळात तैनात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आली होती. माहिती फार्स असल्याचे वास्तव बघितल्यानंतर कळते. शनिवारी, रविवारी इस्पितळात पोलीस नावालादेखील दिसले नाहीत.
-तर मानसिक आघाताची शक्यता
प्रथमेश गाढ निद्रेत असतो. कधी हलकेच पापण्यांची हालचाल करतो. तो कधीही डोळे उघडू शकतो. तो अचानक शुद्धीवर आला नि त्याचा गळा चिरणाऱ्यांपैकी कुणी समोर उभा दिसला तर त्याच्या कोमल मनावर गंभीर मानसिक आघात होऊ शकतो. तो कायमचा कोमात जाऊ शकतो, असे मत मानसतज्ज्ञांचे आहे.
प्रथमेशचा गळा कापल्यामुळे, प्रथमेश मृत पावला असे वाटल्यामुळे ज्या-ज्या मंडळींना आनंद झाला, त्या-त्या असुरांना प्रथमेश मुर्च्छितावस्थेत असल्याचाही आनंद आहे. प्रथमेश जागूच नये, अशी मनस्वी इच्छा बाळगणारे तो जागा झाल्याचे दिसताच संधी साधणार नाही याची काय शाश्वती?
पोटच्या लेकरासाठी झाले नसतील तितके प्रथमेशच्या भेटीसाठी अस्वस्थ होणारे पोलिसांच्या रडारवर यायलाच हवे. सर्वांचीच नोंद उपलब्ध नसली तरी प्रथमेशला भेटणाऱ्या प्रत्येकाची नावे शक्य त्या पद्धतीने हुडकून काढल्यास तपासात निर्णायक वळणे मिळू लागतील. कुणी एकटे, कुणी दोघे तर कुणी समुहाने भेटीला आले आहेत. पोलीसदप्तरी त्यांची नोंद नाही. प्रथमेशच्या आप्तस्वकियांपासूनही नाव-पते लपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अशा प्रत्येकाची बारीक चौकशी व्हायला हवी. घात केव्हाही होऊ शकतो.

दोघांना १९ पर्यंत पोलीस कोठडी
नरबळीच्या उद्देशाने प्रथमेशचा गळा कापणारे आरोपी नीलेश जानराव ऊके (२२) व सुरेंद्र रमेश मराठे (३०) दोघेही रा. पिंपळखुटा यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस.एस.भिष्य यांनी १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १५ आॅगस्ट रोजी दोघांनाही न्यायासनासमोर पेश करण्यात आले होते. याच प्रकरणातील १६ वर्षीय आरोपीची बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्या नेत्तृत्वात मंगरुळ दस्तगिरचे ठाणेदार शैलेश शेळके यांच्यासह पोलीस बंदोबस्तात दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

राज्यभरातील ढोंगी महाराजांची चौकशी करा : बच्चू कडू
पिंपळखुटा येथील नरबळीचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. प्रथमेशची नागपूर येथे जाऊन मी भेट घेईन. त्याला वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत करू. मातंग समाज संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या उत्तरादाखल त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले. पोलिसांनी राज्यभरातील ढोंगीबाबा व महाराजांची चौकशी करावी. राज्यात असे किती बाबा व महाराज आहेत, याची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करून नरबळी प्रकरणात आरोपींना प्रोत्साहित करणाऱ्यांनासुद्धा अटक व्हावी. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी उशिर का केला, हे तपासण्यात यावे, असे आ. बच्चू कडू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Prathamesh's life is threatened again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.