कारागृहात आता विद्युत दिवे निर्माण प्रकल्प
By Admin | Updated: November 2, 2014 22:23 IST2014-11-02T22:23:15+5:302014-11-02T22:23:15+5:30
कारागृहातील बंदीजनांचे कौशल्य वाढीस लागावे, त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती नाहीसी व्हावी, या हेतूने येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लवकरच विद्युत दिवे निर्माण करण्याचा प्रकल्प साकारला जाणार आहे.

कारागृहात आता विद्युत दिवे निर्माण प्रकल्प
गणेश वासनिक - अमरावती
कारागृहातील बंदीजनांचे कौशल्य वाढीस लागावे, त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती नाहीसी व्हावी, या हेतूने येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात लवकरच विद्युत दिवे निर्माण करण्याचा प्रकल्प साकारला जाणार आहे. या नवीन प्रकल्पात ४०० ते ५०० बंदिजनांना सामावून घेतले जाणार आहे. सध्या येथे बंदी जणांसाठी काही लघु उद्योग सुरु आहेत.
येथील मध्यवर्ती कारागृहात हल्ली महिला, पुरुष अशी १०८० एवढी बंदी जणांची संख्या आहे. सूर्योदय ते सूर्यास्त अशी कारागृहात बंदिजणांची दिनचर्या असली तरी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची आहे. यामुळे प्रशासनाच्याही उत्पन्नात वाढ होते. बंदीजनांच्या कौशल्याचा वापर करुन त्यांच्या हातून विविध वस्तू तयार करुन त्या विक्रीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची नियमावली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने बंदीजणांच्या हातून विद्युत दिवे निर्माण करण्याचे ठरविले आहे. बंदीजनांना विद्युत दिवे निर्माण करण्याचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी वर्धा येथील एका एजन्सीसोबत बोलणीसुद्धा सुरु आहे. येत्या आठवड्यात ही एजन्सी येथील कारागृहात येणार असल्याची माहिती आहे. कारागृहाच्या क्षमतेनुसार विद्युत दिवे निर्माण करण्याचा प्रकल्प साकारण्याची तयारी प्रशासनाची आहे. प्रारंभी छोट्या स्वरुपात प्रकल्प सुरु केला जाणार असून भविष्यात विद्युत दिव्यांची मागणी वाढल्यास या प्रकल्पाचा विस्तार केला जाईल. विद्युत दिवे निर्मितीसह सुगंधी तेल, खोबरेल तेल पॅकिंगचाही लघु उद्योग सुरु करण्यावर कारागृह प्रशासनाचा भर आहे. कारागृह विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मनात न्युनगंडाची भावना निर्माण न होऊ देता रोजगार निर्मितीचे वेध लागावे यासाठी वेगवेगळे प्रकल्प साकारले जात आहेत.