पीआर कार्ड ऑनलाईनच; ऑफलाईनला पुर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST2021-07-09T04:09:34+5:302021-07-09T04:09:34+5:30
पान ३ चे लिड अमरावती : जनतेची फसवणूक टाळण्याकरिता तसेच मालमत्ता मिळकत पत्रिकेचे (पीआर कार्ड) सुरळीत वितरण होण्यासाठी त्या ...

पीआर कार्ड ऑनलाईनच; ऑफलाईनला पुर्णविराम
पान ३ चे लिड
अमरावती : जनतेची फसवणूक टाळण्याकरिता तसेच मालमत्ता मिळकत पत्रिकेचे (पीआर कार्ड) सुरळीत वितरण होण्यासाठी त्या ऑनलाईन देण्यात याव्यात, अशा सूचना उपअधीक्षक भूमी अभिलेखला देण्यात आल्या आहेत.
मालमत्ता मिळकत पत्रिकेचे वाटप हे ऑनलाईन पध्दतीने महाभूलेख संकेतस्थळावरून करावे. ज्या मिळकत पत्रिका ऑनलाईन झालेल्या नसतील, अशा मिळकत पत्रिकांची नागरिकांकडून मागणी झाल्यास उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांनी तत्काळ नियमानुसार मिळकत पत्रिका ऑनलाईन करून महाभूलेख संकेतस्थळावरून निर्गमित करावे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन मिळकत पत्रिका वितरित करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेख अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील नझुल शीट प्लॉटबाबत होणारे फेरफार, फेरफार झाल्यानंतर मिळकत पत्रिका तयार करणे, मिळकत पत्रिका वितरण करणे, मिळकत पत्रिकेकरिता आकारण्यात येत असलेले शासकीय शुल्क, फेरफार करतांना संबंधीत पक्षकारांना कोणतीही सूचना न देता फेरफार प्रमाणित करणे, बनावट आखीव पत्रिका तयार करून वितरित करणे, तसेच आकारण्यात येणारे शुल्क चलनाद्वारे शासकीय खजिन्यात जमा न करता अपहार करणे आणि नियमबाह्य कामकाज होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकरणांपासून जनतेची फसवणूक टाळण्यासाठी मालमत्ता मिळकत पत्रिकेचे वितरण ऑनलाईन पध्दतीने महाभूलेख या संकेतस्थळावरून करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा पदसिध्द भूमी अभिलेख उपसंचालक शैलेश नवाल यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी विशेष सूचना निर्गमित केल्या.
असे आहेत दर. महानगर पालिका क्षेत्राकरिता १३५ रुपये, अ, ब, क वर्ग नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्राकरिता ९०, तर ग्रामीण क्षेत्रासाठी ४५ रुपये इतके शासकीय शुल्क भरून मिळकत पत्रिका मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उपअधीक्षक (भूमी अभिलेख) कार्यालयामधून कोणत्याही मिळकत पत्रिकेचे वितरण करण्यात येणार नाही.
येथून मिळवा मिळकत पत्रिका
मिळकत पत्रिका ही सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रामधून ऑनलाईन पध्दतीने महाभूलेख संकेतस्थळवरून वितरित करण्यात येईल. मिळकत पत्रिकेसाठी उपरोक्तप्रमाणे पत्रिका शुल्क व सेतू सुविधा शुल्क २५ प्रमाणे (मिळकत पत्रिकांचे एकूण ५ पानांपर्यंत) आकारण्यात येईल. त्यापुढील प्रत्येक पानाकरिता दोन रुपये आकारून नागरिकांना पत्रिका उपलब्ध करून द्याव्यात.
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामधून ज्या मिळकत पत्रिका ऑनलाईन झालेल्या नसतील, अशा बाबतीत विशेष परिस्थितीमध्ये ऑफलाईन मिळकत पत्रिका वितरित करणे आवश्यक असल्यास मूळ मिळकत पत्रिकेची छायांकीत साक्षांकीत प्रत सेतूमधून वरीलप्रमाणे शुल्कचा भरणा केल्यावर संबंधितांना वितरित करावे. तसेच याबाबतची स्वतंत्र नोंदवही जतन करून ठेवावी.