राजुरा बाजार येथे विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:16+5:302021-07-08T04:10:16+5:30
राजुरा बाजार : दहा गावांचा कारभार असलेल्या राज्य वितरण कंपनीच्या कार्यालयाला १२ महिन्यांपासून कारभार प्रभारी अभियंताच्या भरवशावर असून, कार्यालय ...

राजुरा बाजार येथे विजेचा लपंडाव
राजुरा बाजार : दहा गावांचा कारभार असलेल्या राज्य वितरण कंपनीच्या कार्यालयाला १२ महिन्यांपासून कारभार प्रभारी अभियंताच्या भरवशावर असून, कार्यालय वाऱ्यावर असल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेच्या वारंवार लपंडावाने विजेची उपकरणे निकामी झाली आहेत.
बारा महिन्यांपूर्वी बदलीवर गेल्याने त्या जागी बदलीवर नवीन अभियंता रुजू झालेला नाही. अभियंता नसल्याने गाडेगाव येथील अभियंता कारभार पाहत आहे.
राजुरा बाजार
या कार्यालयांतर्गत राजुरा बाजार, अमडापूर, वडाळा, वाडेगाव, काटी, चिंचरगव्हाण, मोरचुद, डवरगाव, फतेपूर या गावाचा कारभार या कार्यालयांतर्गत येतो. राजुरा या गावी नजीकच्या गावाची बाजारपेठ आहे. बँक, दवाखाना, बाजार समिती, कृषिकेंद्र व शासकीय कार्यालये व विजेच्या वारंवार लपंडावाने व तापमानातील असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असून, वीज वितरण कंपनीचे अधिकारी वरिष्ठांकडे बोट दाखवीत आहेत. वारंवार विजेच्या लपंडावाने अनेक घरांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे फ्रिज, टीव्ही, कम्प्युटर बिघडले आहेत, तर काहींची उपकरणे वीजपुरवठा अनियमित असल्याने जळाल्याची तक्रार येथील व्यावसायिकांनी केली आहे. अभियंता नसल्याने वीजग्राहकांची तक्रार वेळीच निकाली निघत नाही. बरेच दिवस वीजग्राहकांना वाट पहावी लागत आहे. महावितरण कंपनीने या त्रासातून सामान्य नागरिकांची सुटका करावी व कायमस्वरूपी अभियंता देण्याची मागणी नागरिक करीत आहे.
कोट
राजुरा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गतवर्षीपासून वाऱ्यावर आहे. या कार्यालयाला कुणीच वाली नाही. वीजपुरवठा नेहमीच अनियमित असते. वीजग्राहक त्रस्त झाले आहे.
- नीलेश धुर्वे,
सरपंच, राजुरा बाजार
राजुरा बाजार येथील कार्यालयात बारा महिन्यापासून अभियंता नाही, हे खरे आहे.
वरच्या मोर्शी, अमरावती कार्यालयाकडे मागणी केली आहे.
- राजेश दाभाडे,
उपकार्यकारी, अभियंता
महावितरण कार्यालय,उपविभाग, वरूड
वीज कंपनीच्या कार्यालयास कळविल्यानंतरही गेल्या १ महिन्यापासून वीजपुरवठा अनियमित राहिल्याने घरगुती वीज उपकरणांत तीनदा बिघाड होऊन दुरुस्ती केली. कोरोनाकाळात महावितरणने वीज देयकाची पठाणी वसुली केली. आम्ही त्रस्त आहोत. महावितरणने निवासी अभियंता द्यावा.
- सुधाकर डाफे, माजी उपसरपंच तथा वीज ग्राहक
राजुरा बाजार