बायोमेट्रिक अर्जासाठी हिरावला गरिबांचा घास
By Admin | Updated: April 30, 2015 00:26 IST2015-04-30T00:26:45+5:302015-04-30T00:26:45+5:30
नागरिकांना लवकरच बायोमेट्रिक पद्धतीने रेशनधान्य मिळणार आहे. यासाठी आधारकार्ड व माहिती रेशनदुकानदार संकलित करुन फार्म भरत आहेत.

बायोमेट्रिक अर्जासाठी हिरावला गरिबांचा घास
अमरावती : नागरिकांना लवकरच बायोमेट्रिक पद्धतीने रेशनधान्य मिळणार आहे. यासाठी आधारकार्ड व माहिती रेशनदुकानदार संकलित करुन फार्म भरत आहेत. दुकानातच सर्व माहिती शिधाधारकांकडून मिळावी, असा अनेक दुकानदारांचा अट्टाहास आहे. जे शिधापत्रिकाधारक आधारकार्डच्या झेरॉक्स आणतील त्यांनाच रेशनधान्य देण्याचा तुघलकी प्रकार अनेक दुकानात सुरु आहे. गुरुवार ३० एप्रिल ही अखेरची तारीख असल्याने हजारो नागरिक रेशनधान्यापासून वंचित राहणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधार कार्डची सक्ती करता येत नाही. परंतु संगणकीकृत शिधापत्रिकांसाठी असलेल्या फार्मची प्रक्रिया लवकर संपावी यासाठी कार्डवर असलेल्या सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स ही रेशन पाहिजे असल्यास सोबत आणावी अन्यथा रेशनधान्य देणार नाही, असा पावित्रा अनेक दुकानदारांनी घेऊन शिधाधारकांना परत पाठविले आहे. यामुळे गरिबांचा घास हिरावल्या जात आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिका धारकांना नि:शुल्क असणाऱ्या या अर्जाचे अनेक दुकानदार १० रुपये वसुल करीत आहे. वास्तविकता हा फार्म भरण्यासाठी रेशन दुकानदारांना प्रति फार्म ५ रुपये मिळत आहे. विशेष म्हणजे दुकानदारांनी हा फार्म भरण्यासाठी माणसे नेमली आहेत.
नि:शुल्क अर्जाचे १० रुपये
संगणकीकृत शिधापत्रिकांसाठी असणारे ६ लाख ५ हजार १२१ प्रपत्र शिधापत्रिकांकडे पोहचविली असल्यास पुरवठा विभागाचा अहवाल असला तरी फक्त १ हजार ९०६ रेशनदुकानदारांना वितरित करण्यात आली आहे व हे दुकानदार त्यांना वाटेल त्या पद्धतीने प्रपत्र भरण्याची कार्यवाही करीत आहे. हे प्रपत्र नि:शुल्क आहे. प्रत्येक प्रपत्रासाठी रेशन दुकानदाराला ५ रुपये मिळणार आहे. अनेक दुकानात या अर्जासाठी दहा रुपये घेतले जातात.
नागरिकांना आधारकार्डची सक्ती करता येत नाही. आधारकार्डची झेरॉक्स दिली नाही म्हणून रेशन धान्य रोखले जाऊ शकत नाही. याविषयी रेशन दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. शिधापत्रिका धारकांनीही आधारकार्ड देण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.
- बी.के. वानखडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी.
प्रपत्र भरण्यासाठी पुरवठा विभागाद्वारा रेशन दुकानदारांवर दबाव टाकण्यात येत आहे. आधारकार्डची सक्ती करता येत नाही. याविषयी सर्व तालुकाध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत. पुरविण्यात आलेल्या प्रपत्रात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत.
- सुरेश उल्हे,
जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदारसंघ.