पोल्ट्री व्यवसायाला २९ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:46+5:30
कोरोना विषाणूच्या बातमीपाठोपाठ ब्रॉयलर कोंबड्या व अंड्यांमार्फत हा विषाणू प्रसारित होत असल्याची माहिती सोशल मीडियावर धडकली. त्याची शहानिशा न करता, मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्ला जो-तो देऊ लागला. परिणामी कोंबड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा संबंध चिकन व अंडी उत्पादनाशी समाज माध्यमांतून जोडला गेला.

पोल्ट्री व्यवसायाला २९ कोटींचा फटका
जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काही दिवसांपासून चीनसह अन्य देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर सोशल मीडियावर शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट फिरत आहेत. यामुळे सामिष भोजन करणाऱ्यांनी मांसाहार, कोंबडी व अंड्यांपासून दूर राहणे पसंत केले. यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील ८०० पोल्ट्री फार्मधारकांना सुमारे २९ कोटी रुपयांचा एकत्रित फटका बसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या बातमीपाठोपाठ ब्रॉयलर कोंबड्या व अंड्यांमार्फत हा विषाणू प्रसारित होत असल्याची माहिती सोशल मीडियावर धडकली. त्याची शहानिशा न करता, मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्ला जो-तो देऊ लागला. परिणामी कोंबड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा संबंध चिकन व अंडी उत्पादनाशी समाज माध्यमांतून जोडला गेला. मात्र, चिकन व अंडी यांचा या आजाराशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात अफवा पसरल्याने पोल्ट्री उद्योगाला प्रचंड आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.
जिल्हाभरात जवळपास ८०० पोल्ट्री व्यावसायिक आहेत. या ठिकाणी सद्यस्थितीत २० लाखांवर पक्षी आहेत. परंतु, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या खोडसाळ पोस्टमुळे साधारणपणे २९ कोटींची फटका व्यावसायिकांना बसला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांकडे जिल्हा पोल्ट्री असोसिएशनने निवेदन दिले. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे होत असलेल्या नुकसानाची शासनाने दखल घेऊन त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
शासनाकडे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आवश्यक तो पाठपुरावा केला जात असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राहाटे यांनी सांगितले.
सोशल मीडियावर पसलेल्या अफवेकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार कोरोना विषाणू व पोल्ट्री व्यवसायाचा काहीही संबंध नाही.चिकन व अंडी खाणे आरोग्यास फायदेशीर आहे.
- डॉ. विजय राहाटे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी